24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रवारक-यांची मांदियाळी, ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली

वारक-यांची मांदियाळी, ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली

एकमत ऑनलाईन

पुणे : दोन वर्षांनंतर वारक-यांच्या उपस्थितीत जगद्गुरु संत तुकोबांचा पालखी सोहळा पार पडणार आहे. देहूत ३२९ दिंड्या दाखल झाल्या असून, येथे वारक-यांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. देहूत मोठ्या संख्येने वारकरी दाखल झाल्याचे विश्वस्त संजय महाराज मोरे व माणिक महाराज मोरे यांनी सांगितले. पालखी प्रस्थान होताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तुकोबांच्या पादुकांचे पूजन होईल. त्यानंतर दुपारी २ च्या सुमारास संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होईल, असे यावेळी सांगण्यात आले.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे मोजक्याच वारक-यांच्या उपस्थितीत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पार पडत होता. एसटीमधून महत्त्वाच्या व्यक्तींसोबत पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवत असे. परंतु यावर्षी कोरोना आटोक्यात असून कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोप-यांतून वारकरी देहूत दाखल झाले आहेत. दोन वर्षांच्या खंडानंतर पालखी सोहळा होत असल्याने वारकरी मोठ्या संख्येने वारीत सहभागी होतील, असे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी सांगितले.

जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ््याच्या निमित्ताने उद्या दि. २० जून रोजी पहाटे ५ वाजता संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात श्री विठ्ठल-रुखमाई महापूजा होईल. त्यानंतर पहाटे ६ वाजता वैकुंठस्थान श्री संत तुकाराम महाराज पूजा, सकाळी ७ वाजता संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त, वंशज वारकरी यांच्या हस्ते तापोनिधी नारायण महाराज समाधी महापूजा होईल. सकाळी १० ते १२ रामदास महाराज मोरे (देहूकर) यांचे पालखी प्रस्थान सोहळा काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यामुळे देहूत वारक-यांचा मेळा दाखल झाला असून, मंदिर परिसरात शेकडो दिंड्या दाखल झाल्याने ज्ञानोबा-तुकारामाच्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली आहे.

दुपारी प्रस्थान सोहळा
देहूनगरीत सकाळी ९ ते ११ इनामदार वाड्यात श्री संत तुकाराम महाराज पादुका पूजन होणार असून, लाखो वारक-यांच्या उपस्थितीत दिंडी, पताका आणि तुकोबारायांचा जयघोष करीत दुपारी २ वाजून ३० मिनिटाला पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडेल. सायंकाळी ५ वाजता पालखी प्रदक्षिणा आणि सायंकाळी ६.३० वाजता इनामदार वाड्यात पालखी मुक्कामी राहील. त्यानंतर तेथेच मुख्य आरती होईल, असे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या