मुंबई : सध्या राज्यात काही भागात पावसाने दडी मारली आहे तर काही भागात चांगला पाऊस झाला आहे. मुंबईसह उपनगर आणि ठाणे परिसरात रात्रभर पावसाने हजेरी लावली.
त्यामुळे मुंबईकरांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. तसेच गडचिरोलीतही १५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर चांगला पाऊस झाला. त्याचबरोबर चंद्रपूरमध्ये देखील समाधानकारक पाऊस झाला. या ठिकाणी पडलेल्या पावसामुळे शेतकरी आनंदी आहेत.
तर दुसरीकडे अद्यापही पावसाने दडी मारली आहे. तेथील शेतकरी पेरणीसाठी पावसाची वाट बघत आहेत. दरम्यान, पुढील तीन ते चार दिवसांमध्ये दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातही प्रामुख्याने घाट विभागांमध्ये काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज आहे.
तब्बल १५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गडचिरोलीत चांगला पाऊस झाला. याआधी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात समाधानकारक पाऊस पडला होता. या पावसाच्या आगमनाने उष्ण हवामानापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अचानक बरसलेल्या पावसाने शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दरम्यान पेरणीसाठी आणखी दमदार पावसाची गरज आहे.
पेरणीसाठी दमदार पावसाची गरज
दहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर चंद्रपुरात पाऊस पडला आहे. याआधी २० जून रोजी पाऊस पडला होता. या पावसामुळे उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. अचानक बरसलेल्या पावसाने शहरातील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. समाधानकारक पाऊस नसल्याने जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या आहेत. केवळ ५ टक्केच पाऊस झाल्याने पेरणीसाठी दमदार पावसाची गरज आहे.
पुढील तीन ते चार दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
येत्या ३ ते ४ दिवसांत कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्या परिस्थितीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावर उद्या आणि परवा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईत वाळकेश्वर, मलबार हिल, माटुंगा, सायन, दादर या भागात चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, ४८ तासांत मुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ कृष्णकांत होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे.