पुणे : शिवसेना आणि भाजपची युती नैसर्गिक होती. महाविकास आघाडीसोबतची युती नैसर्गिक नव्हती, असे शिंदे गट आणि भाजपकडूनही वारंवार सांगितले जात आहे. त्यावर ज्येष्ठ विचारवंत, प्राध्यापक हरी नरके यांनी सवाल केला आहे. एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत केलेली युती ही नैसर्गिक युती कशी काय होऊ शकते? जनतेने तुम्हाला म्हणजेच युतीला कौल दिला होता हे मान्य आहे.
पण तो कौल तुमचाच पक्ष फोडण्यासाठी नव्हता, असा टोला हरी नरके यांनी शिंंदे गटाला लगावला आहे. तुम्ही गुवाहाटी, सुरत असे पळत जात सत्तेत आलात. मग ही नैसर्गिक युती कशी काय? तुम्हाला जर भाजपसोबत नैसर्गिक युती करायचीच होती तर मग त्याला अडीच वर्षे का लागली? मग भाजपने अजित पवारांसोबत जे सरकार बनवलं होतं ती कोणती नैसर्गिक युती होती? किंवा जम्मू-काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्तींसोबत बनवलेले सरकार कुठल्या नैसर्गिक युतीच्या आधिपत्याखाली होते?, असा सवालच हरी नरके यांनी केला आहे.
हरी नरके मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी नैसर्गिक युतीच्या मुद्यावरून भाजप आणि शिंदे गटाला चांगलेच धारेवर धरले. नैसर्गिक युतीच्या नावाखाली या सगळ्या यांच्या लबाड्या आहेत. हे लोक सत्तेसाठी काहीही करू शकतात. मुळात या लोकांचा कुणाचाच लोकशाहीवर विश्वास नाही. २०१४ मध्ये सत्तेवर येताना जी आश्वासने यांनी दिली होती ती कधीच पूर्ण केली नाहीत, असा हल्लाबोलही नरके यांनी केला.
उद्धव ठाकरेंनी सुपारी दिली हे सुचवायचंय का?
गेले महिनाभर आपण महाराष्ट्रामध्ये हे सत्तानाट्य पाहत आहोत आणि ही मंडळी गेली महिनाभर म्हणत होती की, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. त्यामुळे आम्ही ठाकरे घराण्यावर किंवा उद्धव ठाकरे यांच्यावर कुठलीही टीका करणार नाही. पण परवापासून त्यांनी थेटपणे उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. यातून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मारण्याची नक्षलवाद्यांना सुपारी दिली होती असे सूचित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे, असा संशय नरके यांनी व्यक्त केला.
शिंदे साहेबांना झेड प्लस सिक्युरिटी दिली नव्हती असा आरोप त्यांनी करायला सुरुवात केली आहे. पण काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शिंदेंना झेड प्लस सिक्युरिटी दिली असल्याचे स्पष्ट केले आहे, असे त्यांनी सांगितले.
एका बाजूला बाळासाहेबांचे नाव घ्यायचे आणि दुस-या बाजूला त्यांच्याच मुलावर टीका करायची हा चक्क खोटारडेपणा आहे. आतापर्यंत त्यांच्याकडून हे सांगितले गेले की, आम्ही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना मानतो. कारण त्यांची नियुक्तीच बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. मग आता अचानक हे शोध कुठून लावत आहेत? असा सवाल त्यांनी केला.