मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांची निवडणूक शुक्रवारी पार पडली. सहाव्या जागेसाठी अत्यंत चुरशीची लढत झाली, यामध्ये भाजपच्या धनंजय महाडिक यांनी बाजी मारली. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत भाजपावर आरोप केले आहेत.
राज्यसभेची सहावी जागा चुरशीची होती. अखेर राज्यसभेच्या ६ जागांचा फायनल निकाल हाती लागला. महाविकास आघाडीच्या ३ तर भाजपच्या ३ उमेदवारांचा विजय झाला. यावर नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आरोप केलेत. ते म्हणाले, खरे तर चारही उमेदवार निवडून आणणे हे कठीण काम नव्हते. ही निवडणूक गेम प्लॅनची होती, असा आरोप नाना पटोले यांनी भाजपावर केला आहे
. ते म्हणाले, या निवडणुकीसाठी पैशांचा आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर गेम प्लॅनचा भाग होता यामधून आम्हाला शिकण्याजोगे आहे. यातून आम्ही शिकून मोठी भरारी घेऊ, आत्ता आम्ही गेम प्लॅनमध्ये फेल झालो. यात देवेंद्र फडणवीसांचा विजय झाला आहे.
पवारांच्या मनात काय हे माहीत नाही. पण देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक जिंकली आहे. त्यांना हार्दिक शुभेच्छा! संपूर्ण निवडणूक नियोजनानुसार लढवली गेली. आम्ही त्यांच्या गेम प्लॅनमध्ये अडकलो. आम्ही फसलो असे नाना पटोले म्हणाले.
एमआयएमची मते कुठे गेली माहीत नाही
पटोले म्हणाले, एमआयएमने आधी काँग्रेससोबत आहे असे सांगितले, नंतर आम्ही महाविकास आघाडीसोबत असे म्हटले. आम्ही काही त्यांची मते मागितली नव्हती. ती मते कुठे गेली माहीत नाही.
संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी द्यावी ही काँग्रेसची सुरुवातीपासूनच भूमिका होती, पण हा अधिकार शिवसेनेचा होता. पैशाची गर्मी आणि सत्तेचा दुरुपयोग भाजपकडून केला जातोय हे लोकशाहीसाठी घातक आहे.
विधान परिषदेत ६ उमेदवार राहतील. ते सर्व निवडून येतील. या गेम प्लॅनचा वापर करून भाजप जिंकलेय. आम्हीही यातून शिकतोय असे पटोले म्हणाले.