मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला असून शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झालेला आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांना बोलताना भाजपवर टीका केली आहे. मत मिळवण्यासाठी ईडी, सीबीआयचा वापर केला जातो आणि निवडणूक यंत्रणाचाही वापर केला जातो का याची शंका त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. पहिल्या फेरीत आमच्या संजय पवारांना ३३ मते मिळाली हाच आमचा विजय आहे, असे ते म्हणाले.
‘‘दरम्यान राज्यसभा निवडणुकांत आमचा पराभव झाला पण भाजपचा मोठा विजय झाला नाही. आम्ही व्यवहारात पडलो नाही आणि आम्ही व्यापारही केला नाही तरी आम्हाला पहिल्या पसंतीची ३३ मते मिळाली आहेत. ज्या कुणी गद्दारी केली त्यांची यादी आमच्याकडे आहे. ज्यांनी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची नावे आमच्याकडे आहेत पण ठीक आहे पाहून घेऊ.’’ असा इशारा राऊतांनी दिला आहे.
पहिल्या फेरीत संजय पवारांना ३३ आणि धनंजय महाडिकांना २७ मते मिळाली होती. अपक्षातील सहा मते आम्हाला मिळाली पण काही घोडे विकले गेले आहेत. कारण बाजारात जास्त बोली लागली असेल. असा आरोप राऊतांनी केला आहे. आम्ही व्यापार केला नाही, ज्यांनी दगाबाजी केली त्यांची नावे आमच्याकडे आहेत, सुहास कांदे यांचे मत का बाद केले हा संशोधनाचा विषय आहे असे म्हणत त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या मताला आक्षेप घेणार आहोत असे सांगितले आहे.
दरम्यान जे घटक पक्ष आमच्यासोबत होते त्यातील एकही मत फुटले नाही, फक्त घोडेबाजारातील लोकांची मतं आम्हाला मिळू शकली नाहीत असे राऊत म्हणाले. चने टाकले की घोडे कुठेही पळतात, अशा गद्दारी करणा-या आमदारांची नावे आमच्याकडे आहेत. त्यांना आम्ही पाहून घेऊ, असा इशारा दिला आहे. तसेच तुम्ही असेच रात्रीचे उपक्रम करत रहा आणि महाराष्ट्राचा एकदाच घोडेबाजार करून टाका, अशी टीका संजय राऊतांनी भाजपवर केली आहे.