22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeमहाराष्ट्रआमचाच विरोधी पक्षनेता व्हावा

आमचाच विरोधी पक्षनेता व्हावा

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात सरकार बदलल्यानंतर आता विरोधी पक्षनेतेपदासाठी असणारी रेस वाढलेली दिसू लागली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीला देण्यात आलेले आहे. अजित पवार हे विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून विराजमान झालेले आहेत. विविध मुद्यांवरून ते सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.

तर आता विधान परिषदेतल्या विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. सर्वांत आधी या पदासाठी शिवसेनेकडून दावा करण्यात आला, त्यासाठी एका नेत्याचे नावही चर्चेत आले. त्यानंतर राष्ट्रवादीनेही विरोधी पक्षनेता आमचा व्हावा अशी मागणी केली. तर या रेसमध्ये आता काँग्रेसही उतरली आहे, विरोधी पक्षनेता हा आमचाच व्हावा अशी मागणी काँग्रेसकडूनही पुढे करण्यात आली आहे.

विरोधी पक्षनेता आमचाच व्हावा, काँग्रेसची मागणी
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषद घेत ही मागणी ठेवली आहे, याबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले की, खालच्या सभागृहामध्ये आमचे सहकारी आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची निवड झालेली आहे. त्यामुळे वरच्या सभागृहात आमचा विरोधी पक्षनेता व्हावा ही आमची मागणी राहणार आहे. आमचे नेते आणि सीएलपी बाळासाहेब थोरात हे या सगळ्या गोष्टींबाबत दोन्ही पक्षांसोबत आणि नेत्यांसोबत चर्चा करतील, अशी प्रतिक्रिया यावेळी नाना पटोले यांनी दिली आहे.

विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?
गेल्या सरकारमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद हे भाजपकडे होते. प्रवीण दरेकर हे भाजपकडून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून खिंड लढवत होते. आता सरकार बदलल्यानंतर सर्वांत आधी या पदावर शिवसेनेने दावा केला, त्यासाठी शिवसेना नेते अनिल परब यांचे नावही चर्चेत आले. त्यानंतर राष्ट्रवादीनेही या पदावर दावा करत एकनाथ खडसे यांचे नाव चर्चेत आणले. तर आता नाना पटोले यांनी मागणी ठेवल्याने काँग्रेसकडून कुणाचे नाव पुढे येणार हेही पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. काँग्रेसकडून अजून कोणतेही नाव जाहीर करण्यात आले नाही. मात्र लवकरच त्याबाबत ही माहिती समोर येण्याची दाट शक्यता आहे. मात्र या पदावरून आता तिन्ही पक्षांमध्ये खटके उडण्याचीही शक्यता आहे. आता हे विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार? हे आगामी काही दिवसांत कळेलच.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या