मुंबई : महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक यावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत दावोस येथील परिषदेला गेले आहेत. २० उद्योगांचे महाराष्ट्र सरकारशी १ लाख ४ कोटी रुपयांचे करार होण्याची शक्यता, एवढे मोठे करार होण्याची ही पाहिलीच वेळ असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले. दावोसमध्ये कितीही करार झाले असले तरी प्रत्यक्षात जेव्हा गुंतवणूक महाराष्ट्रात येईल तेव्हाच त्यासंदर्भात वक्तव्य करु असे संजय राऊत म्हणाले. तसेच जे उद्योग महाराष्ट्रातून निघून गेले त्यासंदर्भात देखील मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करावे अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
तसेच महाराष्ट्रात १ लाख ४ कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येत असेल तर स्वागत आहे. त्याही पेक्षा गंभीर गोष्ट म्हणजे अडीच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात होणार होती ती आमच्या डोळ्यासमोर निघून गेली. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ते उद्योग परत आणण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. दावोसला गुंतवणूकदारांची जागतिक जत्रा भरते. त्या जत्रेतून सव्वालाख कोटी आणणार आहेत. ते आल्यावर आम्ही बोलू असे संजय राऊत म्हणाले.