कोल्हापूर : राज्यसभेची उमेदवारी देताना संभाजीराजेंचा ठरवून गेम करण्यात आला. त्यांच्या बाबतीत जे काही घडलं, कोणी घडवलं, हे सर्व संभाजीराजांना माहितीय.
सर्वांनी छत्रपती संभाजीराजेंचा ठरवून गेम केलाय, अशी खरमरीत टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शिवसेनेवर केली होती. यानंतर आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवेंद्रसिंहराजेंच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. कोल्हापूरमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवेंद्रसिंहराजेंना खडेबोल सुनावले.
शिवेंद्रसिंहराजेंनी स्वत: कितीवेळा पक्ष बदलले आहेत. त्यांच्या घराण्यातील कोणत्या लोकांनी कितीवेळा पक्ष बदलले आहेत, ते कोणत्या पक्षात गेले होते? मग शिवेंद्रराजे यांना राजकीय पक्षांचं वावडं आहे का? तुम्ही आम्हाला कशाला तोंड उघडायला लावताय, अशा शब्दांत संजय राऊतांनी त्यांना फटकारले आहे. छत्रपतींच्या गादीविषयी आम्हाला पहिल्यापासून आदर होता आणि आजही आहे, असेही राऊत म्हणाले.
राज्यसभेचा हा विषय छत्रपती संभाजीराजे आणि शिवसेनेतला आहे. इतरांनी त्यामध्ये चोमडेपणा करू नये. भाजपला इतकंच वाटत होतं तर त्यांनी संभाजीराजे यांना ४२ मतं द्यायला पाहिजे होती, ती का दिली नाहीत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यसभेची उमेदवारी देताना शिवसैनिकच निवडून जाणार, हे आम्ही ठरवलं होतं. त्यासाठी पहिल्यापासूनच सामान्य शिवसैनिकांच्या नावांचा आम्ही विचार करत होतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
काय म्हणाले होते शिवेंद्रसिंहराजे?
मराठा आरक्षणाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजे यांच्यामागे मोठा जनसमुदाय आहे. संपूर्ण राज्यातील युवक आणि मराठा समाज त्यांच्या मागे आहेत. मात्र, राज्यसभेची उमेदवारी देताना संभाजीराजेंचा ठरवून गेम करण्यात आला. त्यांच्या बाबतीत जे काही घडलं, कोणी घडवलं, हे सर्व संभाजीराजेंना माहीत आहे. सर्वांनी छत्रपती संभाजीराजेंचा ठरवून गेम केला आहे, अशी खरमरीत टीका आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी साता-यात शिवसेनेवर केली होती.