संगमनेर : राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अपक्ष आणि छोट्या पक्षांची मतं मिळावी यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यातच न्यायालालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि मलिक यांना मतदानाचा अधिकार मिळणार की नाही याबद्दल साशंकता असतानाच त्यांना परवानगी मिळाली नाही तरीही महाविकास आघाडी चारही जागेवर विजयी होणार असल्याचा विश्वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात राज्यसभेच्या ६ जागांपैकी २ भाजप, १ काँग्रेस, १ राष्ट्रवादी काँग्रेस तर २ जागा शिवसेनेच्या ( महाविकास आघाडी ) वाट्याला आल्या आहेत. म्हणजेच भाजप २ तर महाविकास आघाडी ४ जागांसाठी निवडणूक ंिरगणात आहे. शिवसेनेच्या चौथ्या उमेदवारा विरोधात भाजपने उमेदवार दिल्याने निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. ही निवडणूक चुरशीची होण्याची चिन्ह असून अपक्षांसह छोट्या पक्षांची मते पदरात पाडण्यासाठी दोन्ही बाजूंनी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाष्य करताना संजय पवार हे शिवसेनेचे जुने कार्यकर्ते आहेत. महाविकास आघाडीची चौथी जागा निवडून यायला काहीच अडचण नसल्याचे म्हटले आहे. ही निवडणूक आमच्यासाठी अवघड नाही कारण आमच्याकडे अपक्षांसह मित्र पक्षांचे संख्याबळ असल्याचा दावा महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. एमआयएम आणि सपाच्या भुमिकेवर बोलताना जे जे सोबत येतील त्यांना बरोबर घेऊ, आम्हाला अनेकजण मदत करणारे आहेत असही थोरात म्हणाले.