ठाणे : प्रचंड राजकीय घडामोडींनंतर राज्यात सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे-भाजप सरकारने सोमवारी विधानसभेत १६४ आमदारांच्या भक्कम पाठिंब्यावर विश्वासदर्शक ठराव जिंकला.
दरम्यान, मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर, एकनाथ शिंदे यांचे निवासस्थानी कुटुंबीयांसोबत सर्वसामान्य शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात आणि आनंदात स्वागत केले.
घराची पायरी चढताच एकनाथ शिंदे यांची पत्नी लता, मुलगा श्रीकांत शिंदे, सून आणि लाडका रुद्रांश यांनी त्यांचे औक्षण करीत स्वागत केले. यावेळी अनेक दिवसांनी माझा नातू रुद्रांश याने मला पाहिल्यावर त्याचाही आनंद गगनात मावत नव्हता, असे शिंदे म्हणाले.
गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या ठाणे शहरातील शक्तिस्थळी उपस्थित राहून शिंदेंनी विनम्रतापूर्वक अभिवादन केले. आपल्या सावलीत तयार झालेला एक सर्वसामान्य शिवसैनिक आज सत्तेच्या सर्वोच्च पदावर विराजमान झालेला पाहून त्यांना मनोमनी नक्कीच अभिमान वाटला असेल याची मला मनोमन खात्री आहे, असे उद्गारही शिंदेंनी काढले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार पुढे घेऊन जाणारे शिवसेना-भाजप युतीचे सरकार पुन्हा महाराष्ट्रात सत्तेत आल्यानंतर शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन शिंदेंनी अभिवादन केले.
धर्मवीर आनंद दिघेंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या टेंभीनाका येथील आनंद आश्रमात उपस्थित राहून त्यांनी पावन स्मृतींना आदरपूर्वक अभिवादन केले.