काहींना जनाची नाही, मनाचीही नाही : फडणवीसांचे प्रत्युत्तर
चिखली/मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वीज बिलावरून चांगलाच सामना रंगला. देवेंद्र फडणवीस यांच्या दुटप्पी भूमिकेवर हल्लाबोल करीत देवेंद्रजी जनाची नाही, मनाची तर लाज बाळगा. मी आव्हान देतो तुम्ही सत्तेत आहात ना वीजबिल माफ करा, असे म्हटले. त्यावर फडणवीस यांनी एक व्हीडीओ ट्विट करून प्रत्युत्तर दिले. काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
उद्धव ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शनिवारी बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे शेतकरी मेळावा पार पडला, त्यावेळी ठाकरे यांनी भाजप, शिंदे गट, फडणवीस यांच्यासह शेतक-यांच्या प्रश्नांवर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी वीज बिल माफीच्या संदर्भात ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांचे जुने विधान ऐकवले. त्यानंतर त्यांच्यावर टीका केली. वर वेगळी भाषा, खालती उतरले की वेगळी भाषा. पश्चिम विदर्भाचा काही भाग राहिला हे मला माहिती आहे. अतिवृष्टीचे पैसे घोषित झाले, किती लोकांना मिळाले चॅनलवाल्यांनी दाखवावे. खोटे बोलून रेटून न्यायचे, अशी त्यांची भूमिका आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी देखील लगेच उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडीओ ट्विट करून काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही, असा टोला लगावला. २०१९ ते २०२२ या मधल्या काळातील त्यांचा शेतक-यांप्रती पोकळ कळवळा महाराष्ट्राने अनुभवला…जे बोलतो ते करतो, फुकाच्या हवेत गप्पा मारत नाही. महावितरणचा हा आदेश २२ नोव्हेंबर २०२२ रोजी जारी झालेला आहे. शेतक-यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे, असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले.
विठोबा, स्वामी
समर्थांनाही पळवतील
गुजरात निवडणुकीसाठी उद्योग तिकडे पाठवताहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री आपल्या राज्यातल्या गावांवर हक्क सांगताहेत. पुढल्या वर्षी कर्नाटकची निवडणूक लागल्यास उद्या भाजप महाराष्ट्राचे तुकडे करतील. मिंधे गप्प बसतील. विठोबाला पण कर्नाटकात नेतील, अक्कलकोटचे स्वामी समर्थ तिकडे नेतील, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.