नागपूर : आज जे काही सुरू आहे तो भास आहे. तात्पुरता आहे. शिवसेना अशा अनेक संकटातून बाहेर आलेली आहे. शिवसेना विदर्भात मोठ्या प्रमाणात काम करीत आहे. शहर आणि ग्रामीण भागात चांगले काम सुरू आहे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदे गटाच्या बंडाने महाआघाडीचे सरकार कोसळल्यानंतर खासदार संजय राऊत प्रथमच नागपुरात आले. दोन दिवसांसाठी नागपूर दौ-यावर आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी विमानतळावर संवाद साधला. आधी मी मुख्यमंत्र्यांच्या शहरात येत होतो. आज मी उपमुख्यमंत्र्यांच्या शहरात आलो, असे आठवणही संजय राऊत यांनी करून दिली.
संजय राऊत यांनी आपण वारंवार नागपूरला येणार असल्याचे मागे जाहीर केले होते.
मात्र, त्यावेळी शिवसेना एकजूट होती. भाजपला पराभूत करण्यासाठी आघाडीने पुढील निवडणुका एकत्रितपणे लढाव्या यावर सर्व नेत्यांचे एकमत होते. आता शिवसेना फुटली आहे. आता त्यांना आपले सहकारी फुटू नये याची अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
सरकार बेकायदेशीर
मुळात शिंदे-भाजपचे सरकार बेकायदेशीर आहे. १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असताना मुख्यमंत्र्यांनी शपथ घेणे योग्य नाही. त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होत आहे. अशावेळी राजभवनातून शपथ देणे बेकायदेशीर आहे. महाराष्ट्रात घडलेल्या प्रकारानंतर नागपूर आणि नागपूर ग्रामीण भागातील शिवसैनिकांचे मत जाणून घेण्यासाठी आलो आहे, असेही खासदार संजय राऊत म्हणाले.