मुंबई : माजी नेते रामदास कदम यांनी आज माध्यमांना बोलताना ठाकरेंवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी आपल्या आयुष्याची संध्याकाळ अशी होईल असे वाटले नव्हते. पक्षातून अशा प्रकारे आपली हकालपट्टी केली जाईल असेही वाटले नव्हते अशी टीका त्यांनी शिवसेनेवर करत अजूनही मी शिवसेना जोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. रामदास कदम यांच्या टीकेला शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा रामदास कदमांनी शुभेच्छाही दिल्या नाहीत. आणि ते सांगतात की मी शिवसेनेशी बेइमानी केली नाही. ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर, मी मरेपर्यंत शिवसेनेसोबत आहे असे म्हणणा-या कदमांनी ‘मातोश्री’वर पाऊलदेखील ठेवले नाही.
एवढी कूपमंडूक विचारांची माणसं आहेत ही, स्वयंकेंद्री माणसं आहेत. असे म्हणत अरविंद सावंत यांनी कदमांना प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला काय कमी केलं आहे हे त्यांनी समोर येऊन सांगावं, त्यांच्या सांगण्यावरून आम्ही त्यांचं पुनर्वसन केलं तरी ते शिवसेनेवर आरोप करत आहेत असे सावंत म्हणाले.
रामदास कदम यांना फक्त सत्ता पाहिजे. जर तुम्हाला राष्ट्रवादीची अडचण होती तर तुम्ही २०१९ला का नाही सांगितलं की राष्ट्रवादीसोबत जायचं नाही? असे म्हणत त्यांनी कदमांवर टीका केली आहे. ज्यांनी तुम्हाला एवढं मोठं केलं त्यांना सोडून तुम्ही जाता त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही. उद्धव ठाकरे आजारी असताना तुम्ही त्यांना दगा दिला पण आम्ही जगलो तरी शिवसेनेसाठी आणि मेलो तरी शिवसेनेसाठी असं काम करत आहोत, असे सावंत म्हणाले.