मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर प्रश्न उपस्थित केला आहे. जितेंद्र नवलानी प्रकरणाचा तपास कुठवर आला आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. राज्य सरकारने याबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणीदेखील सोमय्या यांनी केली आहे.
किरीट सोमय्या यांनी ट्विटच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारवर जितेंद्र नवलानी प्रकरणाच्या मुद्यावर टीका केली आहे. जितेंद्र नवलानी प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस आर्थिक गु्न्हे शाखा करत आहे की एसीबी मुंबई करत आहे असे विचारताना सोमय्यांनी आर्थिक गुन्हे शाखा विभागाच्या विशेष चौकशी पथकाचे काय झाले, असा सवालही केला आहे. एसीबीने प्राथमिक चौकशी किती दिवसात पूर्ण केली असा प्रश्नही त्यांनी केला.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी जितेंद्र नवलानीविरोधात खंडणी वसुलीचे आरोप केले होते. नवलानीने उद्योजक, व्यावसायिकांना ईडीची धमकी देऊन वसुली केली असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील एक तक्रार नोंदवून तपास सुरू केला.
जितेंद्र नवलानी याने ईडी अधिका-यांच्या नावाने विविध खासगी कंपन्यांकडून ५८ कोटी ९६ लाख ४६ हजार रुपये उकळले आणि स्वत:च्या कंपन्यांच्या माध्यमातून ती रोकड ‘व्हाईट’ केल्याचे ऍण्टी करप्शन ब्युरोच्या तपासात निष्पन्न झाल्याने जितेंद्र नवलानी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जितेंद्र नवलानीविरोधात महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लूक आऊट नोटीस जारी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवलानी हा परदेशात फरार झाल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. त्यामुळेच नवलानीविरोधात लूक आऊट नोटीस काढण्यात आली आहे.