मुंबई : वटपौर्णिमा हा महिलांचा सण आहे. तो फक्त सुवासिनींचा सण नाही आहे. माझं सगळ्या महिलांना आवाहन आहे की ज्या विधवा महिलांना आपल्या पतीसाठी ही पूजा करावी वाटते, त्या महिलांनी आवर्जून ही पूजा करावी. यात कोणीही भेदभाव करू नये, असे वक्तव्य भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केले आहे.
वटपौर्णिमा साजरी करणा-या महिलांनी वडाच्या झाडाच्या तोडलेल्या फांद्यांची पूजा करण्यापेक्षा एक वडाचे झाड लावून त्याचे कायम पालनपोषण करण्याचा वटपौर्णिमेदिवशी संकल्प करावा. जेणेकरून पर्यावरणाचं देखील आपल्याकडून संवर्धन होईल, त्यामुळे वटपौर्णिमेला झाडाची पूजा करण्यापेक्षा झाड लावण्याचा सल्ला तृप्ती देसाईंनी दिला आहे.
जशी आपल्याला सत्यवानाची सावित्री समजली तशी जोतिबाची सावित्रीही समजली आहे आणि म्हणूनच सत्यवानाच्या सावित्रीचा जयघोष फक्त वटपौर्णिमेच्या दिवशी केला जातो आणि ज्योतिबाची सावित्री प्रत्येकाच्या हृदयात आहे आणि म्हणूनच मुली शिकत आहेत, प्रगती करत आहेत, महिला उच्चपदी काम करत आहेत, असेही त्या म्हणाल्या.
भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई त्यांच्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत येतात. त्यांनी वटपौर्णिमा व्रतावरून आता नवे वक्तव्य केले आहे. त्यांनी आतापर्यंत महिलांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे. त्यांच्या अनेक प्रश्नांवर उत्तरं शोधण्याचं काम त्या कायम करत असतात. यापूर्वी त्यांनी अभिनेत्री केतकी चितळेला पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांच्यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला होता.