मुंबई : ओबीसी आरक्षणावरुन भाजप आक्रमक झाली असून मविआ सरकारविरोधात त्यांनी मंत्रालयावर मोर्चा काढला आहे. यावेळी भाजपचे ओबीसी सेलचे प्रमुख योगेश टिळेकर यांनी मंत्री छगन भुजबळ यांना ओबीसी आरक्षणावरुन थेट सवाल केला आहे. शिवसेनेनं मंडल आयोगाला विरोध केला म्हणून तुम्ही शिवसेना सोडली मग आता राष्ट्रवादी काँग्रेसही सोडणार का? असं त्यांनी म्हटलं आहे.
टिळेकर म्हणाले, राज्याच्या निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांसाठी आरक्षणाची सोडत जाहीर केली आहे. ३१ मे रोजी ही सोडत निघणार आहे. यामुळं ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न निर्माण होणार असून मुख्यमंत्री जरी मंत्रालयात नसतील तरी आमचा मोर्चा मंत्रालयापर्यत जाणार आहे. ये तो एक झाकी है और अभी बाकी है.
महाविकास आघाडी सरकारकडे ओबीसींसाठी पैसे नाहीत. राष्ट्रवादीची पिलावळ ओबीसींच्या विरोधात आहे. शिवसेनेने मंडल आयोगाला विरोध केला म्हणून छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली होती मग आता राष्ट्रवादी सोडणार का? अशा शब्दांत योगेश टिळेकर यांनी ओबीसी नेते भुजबळांवर टीकास्त्र सोडलं.