24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र बळीराजाच्या पाठीशी, बंदला चांगला प्रतिसाद

महाराष्ट्र बळीराजाच्या पाठीशी, बंदला चांगला प्रतिसाद

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.११(प्रतिनिधी) लखीमपूर खेरी घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेल्या आजच्या ‘महाराष्ट्र बंद’ला राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला. ठाणे, जळगाव येथील तुरळक घटना वगळता बंद शांततेत पार पडला. मात्र भाजप व आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोपांच्या जोरदार फैरी झडल्या. हा बंद म्हणजे सरकार पुरस्कृत दहशतवाद व आघाडीचा ढोंगीपणा असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. तर शेतकऱ्यांच्या मारेकऱ्यांना सगळे ढोंगच वाटणे स्वाभाविक असल्याचा पलटवार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला सत्तेची मस्ती आली असून शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्याचे समर्थन करण्यापर्यंत त्यांची मजल गेली असल्याची जळजळीत टीका केली.

केंद्राच्या शेतकरीविरोधी कायद्याच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या चिरंजीवाने गाडी घातल्याने चार शेतकऱ्यांचा व नंतरच्या हिंसाचारात आणखी चौघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे देशभर संतप्त पडसाद उमटले आहेत. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने या घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला राज्याच्या सर्व भागात चांगला प्रतिसाद मिळाला. भाजपाने या बंदला विरोध करताना बंद हाणून पाडण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे काही ठिकाणी आघाडी व भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये चकमकी झाल्या. पण तुरळक घटना वगळता बंद शांततेत पार पडला.

काँग्रेस, राष्ट्रवादीचे आंदोलन , शिवसेनेचे रास्तारोको
मुंबईत काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली राजभवन परिसरात मौन आंदोलन केले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, मत्स्यसंवर्धन मंत्री अस्लम शेख, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, प्रदेश कार्याध्यक्ष नसिम खान, उपाध्यक्ष हुसेन दलवाई, चारुलता टोकस, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप अनेक नेते, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना नाना पटोले यांनी भाजपवर खरपूस टीका केली. कडकडीत बंद पाळून लोकांनी शेतक-यांचे मारेकरी भाजपला सणसणीत चपराक लगावली आहे. बंदला विरोध करून भारतीय जनता पक्षाने आपला खरा शेतकरी विरोधी चेहरा दाखवून दिला आहे. त्यांच्या मंत्र्यांचा मुलगा गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडून मारतो तरीही पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांचे ह्रदय द्रवले नाही. या घटनेतील गुन्हेगारांना वाचवण्यासाठी भाजपा आटापिटा करत आहे. उत्तर प्रदेशात रामराज्याच्या नावाखाली तालीबानी राजवट सुरु असून उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी शेतक-यांचे बळी दिले जात आहेत, अशी टीका पटोले यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसने खा.सुप्रिया सुळे व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा स्मारकासमोर धरणं आंदोलन केले.भाजपकडून या बंदला होत असलेला विरोध म्हणजे शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचे अप्रत्यक्ष समर्थन आहे. लखीमपूरमधील हत्याकांडाची तुलना केवळ जालियनवाला बाग हत्याकांडाशीच होऊ शकते. त्याचा महाराष्ट्रातील घराघरातून निषेध होईल, असे जयंत पाटील म्हणाले.

भाजपला सत्तेची मस्ती-सुप्रिया सुळे
यावेळी बोलताना खा. सुप्रिया सुळे यांनी लखीमपूर घटना अत्यंत क्लेशकारक व माणुसकीला काळिमा फासणारी असल्याची टीका केली. या घटनेचा व्हिडिओ सर्वांना बघावा त्यात माणुसकी दिसते आहे का ते सांगावे. त्यात फक्त क्रुरता दिसते आहे. व्हिडीओ बघताना अंगावर शहारे येतात,तळपायाची आग मस्तकात जारे. यावरून एकच दिसते ते म्हणजे, भाजपाला सत्तेची मस्ती आली आहे. सरकार कुणाचेही असो, पण जे घडले ते चिंताजनक आहे. केंद्रसरकारने जनतेला व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

मनसेचा शेतकरी हत्येला पाठिंबा आहे का? -नवाब मलिक
लखिमपूर येथील शेतकरी हत्येला भाजपचा पाठिंबा आहेच. शिवाय आघाडीने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ ला विरोध करुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी हत्येला पाठिंबा देत आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यावेळी केला. लखिमपूर येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या मुलाने गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडून मारले. त्याला अटक करण्यासाठी टाळाटाळ होत आहे. या प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी तत्काळ पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही मलिक यांनी केली.

महाराष्ट्र बंद हा आघाडीचा ढोंगीपणा-फडणवीस
उत्तर प्रदेशातील घटनेबद्दल महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली. आजचा हा बंद म्हणजे ढोंगीपणाचा कळस आहे. याच मंडळीनी मावळमध्ये पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. लखीमपूर घटनेबद्दल तिथलं सरकार दोषींवर कारवाई करत आहेत. मात्र राज्य सरकार त्या घटनेवर राजकीय पोळी भाजता येईल का या संकुचित विचाराने बंद पुकारला आहे. प्रशासनची मदत घेऊन, वापर करून, दमदाटी करुन लोकांना बंद ठेवायला भाग पाडले जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

कोरोनानंतर आत्ता कुठे दुकाने सुरू होत होती, छोट्या व्यावसायिकांची गाडी रुळावर यायला सुरुवात झाली होती. मात्र पुन्हा या सरकारने दुकाने बंद केली. हे बंद सरकार आहे. आधी योजना बंद केल्या, त्यानंतर अनुदान बंद केलं. करोनाकाळात जेव्हा देश सुरू होता, तेव्हा राज्य बंद केलं आणि आता कुठे छोट्या व्यावसायिकांचं गाडं रुळावर येतंय तर आता पुन्हा सरकारने बंद पुकारला आहे. सरकार स्पॉन्सर दहशतवादाने हा बंद केला जात आहे. जर थोडी नैतिकता असेल तर बंद संपायच्या आधी राज्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना सरकार पॅकेज जाहीर करावे अशी मागणी फडणवीस यांनी केला.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या