विद्या अनिल शेळके : औरंगाबाद जिल्हातील वैजापूर तालुक्यातील उंदिरवाडी या छोट्याशा गावात विद्याचा जन्म
मुलुंड : गेल्या दोन महिन्यांपासून देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. याकाळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद आहे. शहरासह ग्रामीण भागातील रस्ते सामसूम अन् निर्मनुष्य आहेत. एसटी बस, प्रवासी वाहतूक गाड्यांसह देशभरातील रेल्वे सेवा बंद आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत गेल्या दोन महिन्यापासून मुलुंडची एक महिला ओला चालक मुंबईत अडकून पडलेल्या दिव्यांग, महिला आणि गरजू लोकांना आपली सेवा देत आहे. प्रवाशांना त्यांच्या घरापर्यंत सुखरूप आणि सुरक्षित पोहचविण्याचे काम करत आहे. मुलुंडच्या या जिगरबाज वाघिणीचे नाव आहे, विद्या अनिल शेळके. घरात दोन लहान मुले असून देखील ती भीती न बाळगता या संकटकाळात आपली सेवा महाराष्ट्रातील जनतेला देत आहे. मुंबई – पुणे, मुंबई – नाशिक, मुंबई- औरंगाबाद, मुंबई – कोल्हापूर असा लांब पल्याचा प्रवास देखील ती करत आहे.
औरंगाबाद जिल्हातील वैजापूर तालुक्यातील उंदिरवाडी या छोट्याशा गावात विद्याचा जन्म झाला. मात्र कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाकीची होती. काबाड कष्ट करून कसेबसे दहावीपर्यंतचे शिक्षण विद्याने घेतले. २००९ मध्ये तिचा विवाह अनिल शेळके यांच्याशी झाला. हे दांपत्य सध्या मुंबई महानगरातील मुलुंडमध्ये वास्तव्याला आहे. विद्याच्या पतीकडे स्वतःचे वाहन आहे. ते दररोज नाशिक ते मुंबई शेतमालाची वाहतूक करतात. विद्याला १० वर्षांचा आदी नावाचा मुलगा आणि ८ वर्षांची आरोही नावाची मुलगी आहे. या महागाईच्या काळात घरखर्च, मुलांच्या शैक्षणिक खर्च पाहता नुसत्या पतीच्या मिळकतीवर संसाराचा गाडा चालविणे अवघड जात असल्याने विद्याने स्वतः रिक्षा चालवून कुटुंबाला हातभार लावण्याचे ठरवले. २०१५ ला ती रिक्षा चालवायला लागली. मात्र या क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी असल्यामुळे अनेक अडचणी विद्याला येत होत्या. त्यामुळे कर्ज घेऊन तीने ओला टॅक्सी घेतली. त्यानंतर २०१६ पासून ते आजपर्यंत विद्या ओला चालवत आहे.