मुंबई : प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राजस्थानच्या अलवरमधील भाजपच्या जन आक्रोश सभेचा व्हीडीओ ट्विट केला आहे. या सभेत काही महिलांना नाचवण्यात आले होते. यावरुन अंजली दमानिया यांनी चित्रा वाघ यांना सवाल विचारत भाजपवर टीका केली आहे.
गेल्या काही दिवलात उर्फी जावेद प्रकरणावरुन चित्रा वाघ संतप्त झाल्या आहेत. उर्फी जावेदचा नंगानाच महाराष्ट्रात चालू देणार नाही म्हणत चित्रा वाघ यांनी तिच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. उर्फीनेही मी असाच पेहराव करेल म्हणत प्रत्युत्तर दिले आहे. या प्रकरणावरुन दोघींमध्ये वार-पलटवार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अंजली दमानिया यांनी राजस्थानच्या अलवरमधील भाजपच्या जन आक्रोश सभेचा व्हीडीओ ट्विट केला आहे. प्रिय चित्राताई वाघ, भाजपच्या रमेश बिधुरी यांची ही जन आक्रोश महासभा आहे. या बद्दल आपल्याला काय मत आहे? याला आपण कुठली संस्कृती म्हणाल? याला आपण सांस्कृतिक कार्यक्रम म्हणाल का?, असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे.
व्हीडीओत काय?
राजस्थानच्या अलवरमध्ये भाजपची जन आक्रोश महासभा पार पडली. या सभेत महिलांना नाचवण्यात आले होते. या कार्यक्रमाचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता हाच व्हीडीओ रिट्विट करून अंजली दमानिया यांनी चित्रा वाघ यांना सवाल केला आहे. यात चित्रा वाघ यांनाही टॅग केले आहे. अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधताना चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे. त्या म्हणाल्या, चित्रा वाघ यांची पत्रकार परिषद घेतली. ती बघून दु:ख झाले. मला त्यांच्याबद्दल आदर होता. संजय राठोड यांच्याविरोधात त्या लढल्या. मात्र राजकारणात कमबॅक करण्याचा, स्व:तचे अस्तित्व निर्माण करण्याचा किंवा मंत्रीपद मिळवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न होता.