मेहकर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील भालकी तालुक्यातील तुगाव ((हा) येथे जमिनीच्या वादातून महिलेवर गोळीबार करुन तिची हत्या केल्याची रविवारी दि़ १२ जून रोजी घडली आहे़जमीन बळकाविण्याच्या हेतूने ही घडल्याचे सांगितल जात आहे़ या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
रविवारी (दि.१२) रोजी कविता मोहन तुळजापूरे (वय ४०) या महिलेची जमिनीच्या वादातून गोळ्या घालून हत्या करण्यात आली. तुगाव (हा) येथील अंबादास तुळजापूरे यांना १९९१ साली शासनमान्य गायरान जमीन कसून खाण्यासाठी शासनाकडून सी नावाचे प्रमाणपत्र देण्यात आले होते.
या आधारे त्यांच्या त्यांच्या पत्नी सोनाबाई, मुलगा मोहन, सून कविता सर्वे नं २०७ मधील २ एकर २० गुंटे जमीन कसून खात असताना त्यांच्याच भावकीतील बब्रुवान तुळजापूरे ही व्यक्ती गेली पाच ते सहा वर्षे जमीन माझी असून त्या जमिनीवर पूर्णपणे माझा हक्क असल्याचे सांगून वारंवार कधी रायफल तर कधी बंदुकीतून हवेत गोळीबार करून ठार मारेन अशी धमकी देत होता. याला प्रत्यक्षदर्शींनीही दुजोरा दिला.
शनिवारी रात्री शेतात जाऊन बळजबरीने ताबा घेण्यासाठी बब्रुवान तुळजापूरे याने आपल्या नावाचे फलक शेतात लावून आले होता. लावलेले बोर्ड मोहन तुळजापूरे यांनी काढला असता बब्रुवान तुळजापूरे, अमोल तुळजापूरे या पिता पुत्राने हवेत गोळीबार करुन मोहन तुळजापूरे यांना पळवून लावून गावात त्यांच्या घरी येवून त्यांना लाथा बुक्यांनी मारहाण करीत असताना मोहनची पत्नी कविता ही पती मोहन यांना वाचविण्यास गेली असता बब्रुवान तुळजापूरे, अमोल तुळजापूरे या बाप लेकांनी बंदूक व रायफलीमधून दोन गोळ्या झाडून कविता मोहन तुळजापूरे या महिलेस ठार केले.
घटनेनंतर तात्काळ मेहकर पोलीस ठाण्याचे पीएसआय सुर्यकांत करंजे, भालकी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीएसआय नंदकुमार मुळे व पोलीस कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींना ताब्यात घेऊन मयत महिलेचे प्रेत शवविच्छेदनासाठी बिदर येथे पाठवून देण्यात आले आहे. हे़ अधिक तपास पोलिस प्रशासन करीत असल्याचे सांगितले.