23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeमहाराष्ट्रमुंबईत सर्व पोलिस ठाण्यांत महिला सुरक्षा सेल

मुंबईत सर्व पोलिस ठाण्यांत महिला सुरक्षा सेल

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईतील साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. महिलांवर वाढत चाललेल्या अत्याचारांच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने कठोर पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. मुंबईमध्ये आता प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये वुमन सेफ्टी सेलची स्थापना केली जाणार आहे. तसेच निर्भया पथक उपक्रम सुरू केले जाणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील महिला सुरक्षा, महिला अत्याचार प्रतिबंधक उपाययोजना, महिला विषयक गुन्हे, बाल अत्याचार प्रतिबंधक यांच्या अनुषंगाने तपास आणि कार्यवाहीबाबत राज्यातील सर्व जिल्हे, आयुक्तालयनिहाय आढावा घेतला. या बैठकीनंतर मुंबई पोलिसांनी एक नवे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात यासंबंधीची माहिती देण्यात आली. मुंबईत निर्भया पथक आणि सक्षम हे उपक्रम सुरू केले जाणार आहेत. तसेच प्रत्येक पोलिस ठाण्यात वुमन सेफ्टी सेलची स्थापना केली जाणार आहे.

महिलांवरील अत्याचाराच्या घटनेच्या अनुषंगाने घ्यावयाच्या दक्षतेबाबत नुकतीच साकीनाका पोलिस ठाणे हद्दीत रात्रीच्या वेळी एकट्या महिलेवर अत्याचाराची घटना घडली. एवढेच नव्हे, तर नराधम आरोपीने महिलेच्या गुप्तांगात रॉड खुपसला. त्यामुळे गंभीर जखमी होऊन ती महिला मृत्यू पावली. आरोपीने निर्दयीपणाचा कळस गाठला असून, या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले. एवढेच नव्हे, तर यातून महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होवू नये, याकरिता मुंबई पोलिसांनी उपाययोजना कराव्यात, असे आदेश मुंबई पोलिस आयुक्त नगराळे यांनी दिले आहेत.

साकीनाका येथील घटनेच्या वेळी पोलिसांचा प्रतिसाद १० मिनिटाचा होता. अशा घटनांमध्ये नियंत्रण कक्षाची भूमिका अत्यंत महत्वाची असून कोणताही कॉल विशेष करून महिलांसंदर्भात कॉलकडे दुर्लक्ष करू नये व त्याची तात्काळ योग्य ती निर्गती करावी. नियंत्रण कक्ष प्रभारी अधिकारी यांनी यावर सतत लक्ष ठेवावे, असे सक्तपणे सांगण्यात आले आहे. कारण अलिकडे महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले असून, यात कोणतेही टोक गाठले जात आहे. ही वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती मोडून काढायची आहे, त्यासाठी पोलिसांनी दक्ष राहून वेळीच कारवाई करावी. एवढेच नव्हे, तर अशा घटना घडणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या.

मोबाईल ५ वाहन आता निर्भया पथक
मोबाईल ५ या वाहनाला यापुढे निर्भया पथक संबोधले जाईल. प्रत्येक प्रादेशिक विभागाला १ महिला सहाय्यक पोलिस आयुक्त आणि महिला पोलिस निरीक्षक असणार आहे. तसेच निर्भया पोलिसांची वेगळी नोंदवही असावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याने त्याच्या हद्दीतील महिलाविरूद्ध होणा-या गुन्ह्याच्या जागा शोधून काढाव्यात, असे आदेशही देण्यात आले आहे.

निर्जन ठिकाणी गस्त वाढणार
पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनेक ठिकाणी अंधार पसरलेला असतो. या अंधाराचा फायदा घेऊन गुन्हेगार नको ते कृत्य करण्याचा धोका असतो. तसेच निर्जन ठिकाणीही असे प्रकार घडण्याचा धोका अधिक अशतो. त्यामुळे यापुढे अशा ठिकाणांचा आढावा घेऊन या भागात गस्त वाढविण्याची योजना आखली आहे. या भागात बीट मार्शल, पेट्रोलिंग मोबाईल वाहने जास्तीत जास्त वेळा फिरविण्याचा प्रयत्न राहील, असे सांगण्यात आले.

अंधाराच्या ठिकाणी क्यूआर कोड
एक तर जिथे अंधाराची ठिकाणे आहेत किंवा निर्जन ठिकाणे आहेत, अशा ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्याकरिता महानगरपालिकेशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्यात येईल. तसेच अशा ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी संबंधितांकडे प्रस्ताव सादर करून याबाबत पाठपुरावा करावा, अशा सूचना देतानाच निर्जन स्थळी, अंधाराच्या ठिकाणी क्यूआर कोड लावावेत, जेणेकरून अनुचित प्रकार टाळता येईल व त्यास प्रतिबंध करता येईल, असे बजावण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या