मुंबई : प्रतिनिधी
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रोड शो काढून राजकारण करण्याचा प्रयत्न करु नये अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. तर गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी अशा रोड शो ची गरज आहे का? या माध्यमातून भाजप मुंबईत शक्तीप्रदर्शन आणि राजकारण करू पाहत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. तर योगीजी तुम्हाला उद्या दिल्लीत झेप घ्यायची आहे, तेव्हाही इंधन लागेलच असा सल्ला देण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे नित्यनेमाने मुंबई शहरात अवतरले. मुंबईतील उद्योगपती, गुंतवणूकदारांनी त्यांच्या राज्यात उद्योग सुरू करावेत यासाठी या भेटीगाठी आहेत. उत्तर प्रदेशच्या विकासास गती मिळावी म्हणून योगी महाराज वरचेवर मुंबई शहरात पधारत असतात. त्यात काही चूक आहे असे वरकरणी आम्हाला वाटत नाही. बिहार, उत्तर प्रदेश ही राज्ये औद्योगिकदृष्टयÞा मागास आहेत व त्या राज्यांतील मोठी लोकसंख्या रोजीरोटीसाठी स्थलांतरित झाली. मुंबई-दिल्लीत या लोकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे एका कळकळीने योगी आदित्यनाथ हे मुंबईस येतात, पण या वेळी येण्याआधी त्यांनी सर्वच वर्तमानपत्रांत पानभर जाहिराती देऊन स्वत:ची व आपल्या राज्याची प्रसिद्धी केली. उत्तर प्रदेश हे नवीन भारताचे विकास इंजिन आहे. हे इंजिन तुमच्या व्यवसायाला नवीन वेग देणार असे या जाहिरातीत म्हटले आहे.