25.5 C
Latur
Monday, September 27, 2021
Homeमहाराष्ट्रझिका व्हायरसचा राज्यात शिरकाव

झिका व्हायरसचा राज्यात शिरकाव

एकमत ऑनलाईन

पुणे : केरळनंतर आता महाराष्ट्रात झिका व्हायरसने शिरकाव केला आहे. पुणे जिल्ह्यात झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात ५० वर्षीय महिलेला झिका व्हायरसची लागण झाली. सध्या महिलेची प्रकृती स्थिर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. राज्यातील आरोग्य विभागाने ही माहिती दिली. दुसरीकडे केरळमध्येही झिका व्हायरसचे रुग्ण वाढत आहेत. राज्यात आणखी दोन जणांना झिका व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ६३ झाली आहे. सध्या राज्यात ३ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती केरळच्या आरोग्य मंत्री वीना जॉर्ज यांनी दिली.

एडीस जातीचा डास चावल्यानंतर झिका व्हायरसची लागण होते. या डासांची निर्मिती चांगल्या पाण्यात होते. या डासामुळे डेंग्यू, चिकनगुनिया आणि पिवळा ताप होण्याचीदेखील शक्यता आहे. झिका व्हायरसचा सर्वाधिक धोका हा गर्भवती महिलांना असतो. विशेषत: याची लागण गर्भातील बाळाला होण्याची शक्यता असते. तसेच बाळाला विविध आजारदेखील होण्याची शक्यता असते.

अशी आहेत झिका विषाणूची लक्षणे
ताप येणे, अंग दुखणे, तसेच अंगावर लाल रंगाचे चट्टे येणे हे झिका विषाणूची प्राथमिक लक्षणे आहेत. या दरम्यान प्रचंड डोकेदुखी होते, डोळे लाल होणे, अशक्तपणा आणि थकवादेखील जाणवतो. ही लक्षणे दोन ते सात दिवसापर्यंत कायम राहतात. असे असले तरी सुरुवातीला आलेल्या तापावरून झिका विषाणूची लागण झाल्याचे सांगणे कठीण आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी करून निदान करणे आवश्यक आहे.

खबरदारीचा उपाय
डास चावण्यापासून संरक्षण करणे हाच सर्वात मोठा उपाय आहे. संशयित रुग्णांची वेळेवर चाचणी करणे गरजेचे आहे. हा व्हायरस डासांमुळे पसरत असल्याने तुमचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. तसेच डबकी किंवा घरात फार दिवस पाणी भरलेले राहणार नाही, याची काळजी घ्या, असा सल्ला देण्यात आला आहे.

 

पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते मदतीचे वाटप

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या