22.2 C
Latur
Monday, January 12, 2026
Homeमहाराष्ट्र‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ने लुटली रसिकांची मने

‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ने लुटली रसिकांची मने

कलाकारांना प्रत्यक्ष बघण्यासाठी संपूर्ण सातारा उलटला तोबा गर्दीमुळे बॅरीगेट्स लावून प्रवेश बंद करावा लागला

सातारा : प्रतिनिधी
हा हा, ही ही.. चा कल्लोळ, टाळ्यांचा कडकडाट, तुडुंब भरलेल्या स्टेडियमच्या कोप-या कोप-यातून हास्याची कारंजी उडत होती. मोबाईलचे टॉर्च लावून रसिकांनी पौर्णिमेच्या रात्री ता-यांची चमक दाखविली. निमित्त होते ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाचे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अरुण कदम, प्रभाकर मोरे, समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, ओंकार राऊत, नम्रता संभेराव, वनिता खरात, रोहित माने, निखिल बने, प्रियदर्शनी इंदलकर, पृथ्वीक प्रताप, प्रथमेश शिवलकर, शिवाली परब, दत्तू मोरे, चेतना भट, रसिका वेंगुर्लेकर या कलाकारांना प्रत्यक्ष बघण्यासाठी संपूर्ण साताराच नव्हे तर महाराष्ट्राच्या विविध भागातून रसिक मोठ्या संख्येने आले होते.

कलाकारांचा व निर्माते सचिन गोस्वामी, लेखक-निर्माते सचिन मोटे, यांचे सत्कार संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील, महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, विनोद कुलकर्णी, सुनिताराजे पवार, नंदकुमार सावंत, नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाच्या आधीपासूनच मंडपात प्रेक्षक जागा पकडून बसले होते. कार्यक्रम सुरू झाल्यानंतरही रासिकांचा ओघ सुरूच होता. अखेर स्टेडियम काठोकाठ भरल्याने बॅरीगेट्स लावून प्रवेश बंद करावा लागला. साता-याचा लाडका सावत्या(रोहित माने) आणि प्रियदर्शनी इंदलकर यांनी निवेदनातून रसिकांचे स्वागत केले हास्य जत्रेतील गाजलेली अनेक प्रहसने सादर करण्यात आली. सुरुवातीस समीर चौगुले आणि नम्रता संभेराव यांनी शाळेचे प्रहसन सादर केले.

एकही पंच खाली पडू न देता सातारकरांनी कलाकारांना भरभरून दाद दिली. लोकांचे निखळ मनोरंजन करणारी आणि मनमुराद हसवणारी विविध प्रहसने हास्य जत्रेच्या कलाकारांनी सादर केली. सातारकरांनी दिलखुलास प्रतिसाद देत हस्य जत्रेला डोक्यावर घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR