25 C
Latur
Friday, October 4, 2024
Homeमहाराष्ट्रमहाविकासआघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित?

महाविकासआघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित?

ठाकरे, पवार की काँग्रेस कोणाला मिळणार किती जागा?

मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यातच आता राज्यातील सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांकडून जागावाटप, मतदारसंघाची चाचपणी केली जात आहे. त्यातच आता महाविकासआघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकासआघाडी जागावाटपाचा फॉर्म्युला काय असणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गणेशोत्सवानंतर जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी मॅरेथॉन बैठक घेतली जाईल. यानुसार विधानसभेच्या २८८ जागांपैकी १०५ जागांची मागणी काँग्रेसने केली आहे. शिवसेना ठाकरे गटाने १०० जागा मागितल्या आहेत. तर शरद पवार गटाने ९० जागांची मागणी केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकासआघाडीत सध्या जागावाटपाबद्दल सातत्याने चर्चा होत आहे. यानुसार काँग्रेसने १०० ते १०५ जागांवर लढण्याची तयारी केली आहे. तर शरद पवार गटाने ८५ ते ९० जागांवर लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासोबतच ठाकरे गटाने ९५ ते १०० जागांवर लढण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवानंतर महाविकासआघाडीच्या अनेक बैठका होताना दिसणार आहेत. या सर्व बैठका पितृपक्षात होतील. त्यानंतर नवरात्रीपूर्वी किंवा नवरात्रीदरम्यान जागावाटपाबद्दल अंतिम निर्णय जाहीर केला जाईल.

त्यासोबत काँग्रेस आणि ठाकरे गटात मुख्यमंत्रिपदावरून सध्या रस्सीखेच सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते मुख्यमंत्रि­पदाबद्दल विविध विधाने करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटही मुख्यमंत्रि­पदाचा चेहरा कोण हे लवकर जाहीर करावा असे सांगत आहेत. त्यामुळे याच बैठकांमध्ये मुख्यमंत्रिपदाबद्दलही अंतिम निर्णय घेतला जाईल, असे बोलले जात आहे.

पवार गटाचा लोकसभेचा फॉर्म्युला कायम
लोकसभेत पवार गटाने १० जागांवर निवडणूक लढवली होती. यातील ८ जागांवर त्यांना विजय मिळाला होता. त्यानुसार येत्या विधानसभा निवडणुकीतही पवार गटाचा हाच फॉर्म्युला कायम राहणार असल्याचे बोलले जात आहे. शरद पवार येत्या विधानसभेला नवीन चेह-यांना संधी देणार आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत पवार गटाचे ५० हून अधिक आमदार जिंकून येऊ शकतात, असे बोलले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR