मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याचा निर्णय झाल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने येत्या १६ रोजी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात तिन्ही पक्षाच्या पदाधिका-यांचा मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
या मेळाव्याला तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. याच मेळाव्यात विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात येईल असे सांगितले जात आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी बुधवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत तिन्ही पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय घडवून आणण्याच्या दृष्टीने मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.