मुंबई : प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढवण्याबाबत महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील. उद्या आघाडीच्या नेत्यांची बैठक होईल आणि येत्या आठवडाभरात स्थानिक पातळीवरील आघाडीबाबत धोरण ठरवले जाईल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (श.प.) अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या बैठकीत बोलताना स्पष्ट केले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरुणान ५० टक्के तिकिटे दिली जातील असे सुतोवाच करताना, पक्षबांधणीसाठी भाकरी फिरवण्याचे संकेत शरद पवारांनी दिले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची एक बैठक मुंबईत झाली. बैठकीला पक्षाच्या कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, विधीमंडळ पक्षनेते जयंत पाटील, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, रोहित पवार, डॉ. अमोल कोल्हे, खा. निलेश लंके, यांच्यासह पक्षाचे सर्व खासदार, आमदार व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणीसाठी आणि पुढील रणनीती ठरवण्याबाबत चर्चा झाली. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये स्थानिक पातळीवर आघाडी करावी की नाही याबाबत स्थानिक खासदार, आमदार व पदाधिका-यांची मते जाणून घेण्यात आली. उद्या महाविकास आघाडीचे नेते मतदारयादीतील गोंधळाबाबत राज्य निवडणूक अधिका-यांची भेट घेणार आहेत.
मनसे प्रमुख राज ठाकरे हे ही या शिष्टमंडळात असणार आहेत. त्या भेटीनंतर आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार असून त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत प्राथमिक चर्चा होईल व धोरणात्मक निर्णय घेतला जाईल. एकत्र लढायचे की नाही, याबाबत निर्णय झाल्यानंतर जिल्हानिहाय, महापालिका निहाय बैठका घेण्याचे आज निश्चित करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आघाडीतील पक्षांमध्ये मतविभागणी होऊ नाय यासाठी एकत्र लढण्याची आमची भूमिका असल्याचे स्पष्ट केले. मनसेच्या आघाडीतील सहभागाबाबत अद्याप कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
तरुणांना संधी
शरद पवार यांनी बैठकीत मार्गदर्शन करताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या पण पक्षासाठी परिश्रम घेणा-या युवकांना ५० टक्के तिकिटे दिली जावीत, अशा सूचना पदाधिका-यांना दिल्या. संग्राम जगताप यांच्यासंदर्भात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी पदाधिका-यांना, नेत्यांना जातीय सलोखा ठेवण्याच्या सूचना दिल्या. सरकारमधील काही नेते व मंत्रीच सध्या वादग्रस्त बोलत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
तोकड्या मदतीवर टीका
महायुतीने पूरग्रस्त शेतक-यांना केलेल्या मदतीवर शरद पवार यांनी टीका केली. अतिवृष्टीच्या संदर्भात राज्य सरकार जी मदत करत आहे ती तटपुंजी आहे. केंद्रीय पथकाने येऊन पाहणी केली पाहिजे होती. पूर्वी केंद्रीय पथक येऊन पाहणी करून भरघोस मदत देत असे याचीही आठवण त्यांनी दिली.

