27.6 C
Latur
Tuesday, March 10, 2026
Homeमहाराष्ट्रमहायुतीला १० जि. प. त बहुमत

महायुतीला १० जि. प. त बहुमत

सांगली, कोल्हापुरात त्रिशंकू, लातूरमध्ये काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक

मुंबई : प्रतिनिधी
नगरपालिका व महापालिका निवडणुकी पाठोपाठ १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकीतही भाजपा व मित्रपक्षांनी बाजी मारली असून, १२ पैकी १० जिल्हा परिषदांवर स्वबळावर किंवा एकमेकांच्या मदतीने महायुतीचा झेंडा फडकणार आहे. उर्वरित दोन जिल्हा परिषदांमध्ये त्रिशंकू स्थिती असली तरीही बहुमताचा जुगाड करून सत्ता मिळवण्याची तयारी महायुतीने केली आहे. लातूर जिल्हा परिषदेत कॉंग्रेसने जबरदस्त मुसंडी मारली असून, सर्वाधिक २३ जागा जिंकत कॉंग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे.

भाजपने राष्ट्रवादीसोबत युती केल्याने कॉंग्रेसला थोडक्यात सत्तेपासून दूर राहावे लागणार आहे.
नगरपालिका व महापालिका निवडणुकीत यश मिळवून शहरी भागावर वर्चस्व मिळवल्यानंतर भाजपाने १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत मोठे यश मिळवत ग्रामीण भागातही विशेष प्राविण्यासह पहिला क्रमांक पटकावला. महायुतीतील शिंदेंची शिवसेना व स्व.अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही आपली ताकद दाखवून देत दुसरा आणि तिसरा क्रमांक कायम ठेवला. काँग्रेस लातूरमध्ये सर्वांत मोठा पक्ष ठरला तर कोल्हापूर, सांगली येथे त्रिशंकू स्थिती आहे.

कोल्हापूर आणि सांगली जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती आहे. परंतु या दोन्हीही ठिकाणी सत्तेच्या चाव्या काँग्रेसकडे आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सगळीकडे पिछेहाट झाली असून ५० जागा मिळताना त्यांची दमछाक झाली तर अजित पवारांच्या पक्षाशी आघाडी करूनही शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फारसे काही हाती लागलेले नाही. मात्र, सांगली जिल्हा परिषदेत शरद पवार यांचा पक्ष सर्वांत मोठा ठरला आहे. त्यामुळे येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. ते कॉंग्रेससह इतरांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करू शकतात.

७ जिल्हा परिषदांमध्ये भाजप सर्वांत मोठा पक्ष
१२ जिल्हा परिषदांपैकी छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली, धाराशिव, परभणी आणि सातारा या ७ ठिकाणी भाजपा १ नंबरवर आहे तर शिवसेना रत्नागिरी आणि रायगड या दोन ठिकाणी तर राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यात नंबर एकवर आहे. कोल्हापूर आणि लातूरमध्ये त्रिशंकू स्थिती असली तरी भाजपने जुगाड करून सत्ता मिळवण्याची रणनीती आखली आहे.

भाजप पहिल्या क्रमांकावर
२०१७ मध्ये भाजपाला या १२ जिल्हा परिषदेत १४१ जागा मिळाल्या होत्या. आता घोषित निकालांमध्ये २३६ जागा मिळवत भाजपाने पहिला क्रमांक मिळवला आहे.

१२५ पैकी १०० पंचायत समित्या महायुतीकडे
पंचायत समितीत २०१७ मध्ये भाजपाला २८४ जागा होत्या. आतापर्यंत घोषित निकालांमध्ये भाजपाला ४१० जागा मिळाल्या आहेत. १२५ पंचायत समित्यांचा कल पाहिला तर त्यापैकी ५० समिती भाजपाकडे असतील. २६ शिवसेनेकडे तर २३ राष्ट्रवादीकडे असतील. ७ ते ८ काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडेही ७ ते ८ तर उबाठाकडे ५ पंचायत समित्या अशी स्थिती आहे. महायुतीला १२५ पैकी १०० पंचायत समित्या महायुतीकडे जातील अशी स्थिती आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसने कोल्हापूर तसेच लातूरमध्ये चांगली कामगिरी केली. लातूर जिल्हा परिषदेत काँग्रेस मोठा पक्ष ठरला. मात्र कुठेच बहुमत मिळवता आलेले नाही.

महाराष्ट्राच्या जनतेचा महायुतीवरच विश्वास : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा महायुतीवरच आपला विश्वास दाखविलेला आहे. १२ जिल्हापरिषदांमध्ये भाजपा पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थापित झाला आहे. बाराही जिल्हापरिषदांमध्ये महायुतीचीच सत्ता येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. भाजपाप्रमाणेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मित्रपक्षांनाही चांगले यश मिळाले आहे. ग्रामीण भागाची मानसिकता यातून समोर आली आहे. नगरपालिका, महापालिका आता जिल्हापरिषदा या सगळयांमधून राज्य सरकारच्या कामावर जनतेने शिक्कामोर्तब केले असल्याचे फडणवीस म्हणाले.

दुर्दैवाने निवडणुकीच्या दरम्यान अजिदादांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचे दु:ख आम्हा सर्वांना आहे. त्यामुळे मी प्रचारही नाही केला. पण ग्रामीण भागाची मानसिकता यातून समोर आली. आताचे निकाल हा जनतेचा विश्वास आहे. या देशात पंतप्रधान मोदी यांनी ग्रामविकासाचे कार्य हातात घेतले. महाराष्ट्र सरकारनेही कार्य केले. त्यामुळे भाजपा व मित्र पक्षांना समर्थन मिळते. त्यावरून ही भरारी आम्ही मारली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. महाविकास आघाडी फारशी कुठे दिसत नाही. त्यामुळे आम्हाला फारसे काही करण्याची गरज नाही. रोज सकाळी ९ वाजता त्यांचे जे प्रवक्ते वक्तव्य करतात, त्यामुळे त्यांची मते कमी करण्याचे काम ते योग्य प्रकारे करत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

विरोधकांमध्ये जी लढण्याची इच्छाशक्ती असली पाहिजे त्याचा अभाव दिसतो आहे. विरोधी पक्षात काम करताना जनतेत जाऊन काम करावे लागते. विरोधी पक्ष फक्त मिडियामध्येच दिसतो असेही ते म्हणाले. काँग्रेसने आघाडीचा काय निर्णय घ्यायचा हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. पण आघाडीने नुकसान झाले हे कदाचित काँग्रेसला आता समजले असेल असेही ते म्हणाले.

सातारा : एकूण जागा : ६५
भाजप – २३
शिवसेना – १३
राष्ट्रवादी – २२
ठाकरे गट- ०
काँग्रेस : १
इतर- २
सांगली : एकूण जागा : ६१
भाजप – १६
राष्ट्रवादी अजित पवार – ६
काँग्रेस – ११
शिवसेना शिंदे गट – ०७
राष्ट्रवादी शरद पवार गट – १८
शिवसेना ठाकरे गट – १
जनसुराज्य – १
रयत क्रांती (सदाभाऊ खोत) – १

कोल्हापूर : एकूण जागा : ६८
भाजप – १२
शिवसेना (शिंदे) – ९
राष्ट्रवादी – २०
काँग्रेस – १५
शिवसेना (ठाकरे) – १
जनसुराज्य – ६
स्वाभिमानी शेतकरी संघटना – १
शाहू आघाडी यड्रावकर गट : ४
सोलापूर : एकूण जागा : ६८
भाजप – ३६
शिवसेना – ५
राष्ट्रवादी – १०
राष्ट्रवादी शरद पवार – ७
शेकाप – ३
इतर- २

छ. संभाजीनगर : एकूण जागा ६३
भाजप : २३ आणि पुरस्कृत २
शिवसेना : २१ आणि पुरस्कृत १
शिवसेना ठाकरे: ९
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट: ४
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट: १
काँग्रेस : १
अपक्ष : १

परभणी : एकूण जागा : ५४
भाजप : २४
शिवसेना : ०५
शिवसेना ठाकरे गट: ०६
राष्ट्रवादी अजित पवार गट : १५
काँग्रेस : ०३

धाराशिव : एकूण जागा : ५५
भाजप : १९
शिवसेना शिंदे गट : १५
शिवसेना ठाकरे गट: ७
राष्ट्रवादी काँग्रेस : ६
काँग्रेस : ३
समाजवादी : १
अपक्ष : ४

लातूर : एकूण जागा : ५९
भाजप : १८
काँग्रेस : २३
शिवसेना : १
शिवसेना ठाकरे: १
राष्ट्रवादी अजित पवार : १२
राष्ट्रवादी शरद पवार : १
मनसे : १
अपक्ष : २

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR