26.6 C
Latur
Friday, November 7, 2025
Homeमहाराष्ट्रमहायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड

महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड

काँग्रेसचा घणाघात, तात्काळ कर्जमाफीची मागणी फडणवीस सरकारने राज्य दिवाळखोरीत काढले प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

मुंबई : महायुती सरकारने राज्य दिवाळखोरीत काढले असल्याने त्यांच्याकडे योजनांसाठी पैसाच नाही. पंतप्रधान आवास योजनेसाठी पैसे नाहीत, लाडकी बहिण योजनेसाठी पैसे देऊ शकत नाही. पंतप्रधान महाराष्ट्रात येणार म्हणून शेतक-यांना ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले, हे पॅकेज फसवे आहे हे आम्ही आधीच सांगितले होते आता या पॅकेजचा फोलपणा समोर येत आहे. हे पॅकेज एक थोतांड आहे. शेतक-यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्यावे, रब्बी हंगामासाठी बियाणे व खते मोफत द्यावीत तसेच कर्जमाफी करावी. एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांनी दिल्लीत जाऊन राज्यासाठी विशेष पॅकेज आणावे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, जैन बोर्डिंगची जमीन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ गिळंकृत करु पहात होते पण हे प्रकरण चव्हाट्यावर आल्याने मुरलीधर मोहोळ यांना वाचवण्यासाठी तो व्यवहार रद्द करावा लागला आहे. परंतु, हा व्यवहार रद्द करून चालणार नाही, तर या व्यवहारात जे लोक सहभागी होते त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. जमीन हडप करण्याच्या कटात कोण कोण होते याचा पर्दाफाश झाला पाहिजे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. भाजपा ही वॉशिंग मशीन आहे.

अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह अनेकांवर भाजपाने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते पण त्यांनाच पक्षात व सत्तेत सहभागी करून पवित्र करुन टाकले आहे. फलटणच्या घटनेत माजी खासदाराचा उल्लेख होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना क्लिन चिट देणे म्हणजे त्यांचा या कटात सहभाग असल्याचा पुरावाच असल्याचेही हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

राज्याला पुर्णवेळ गृहमंत्र्याची गरज
कायदा सुव्यवस्था वेशीवर टांगली गेली आहे त्यामुळे राज्याला किमान पूर्ण वेळ गृहमंत्री असणे गरजेचे आहे पण फडणवीस यांना गडचिरोलीतील खाणीत जास्त रस असून पंतप्रधानपदावर नजर असल्याने कायदा सुव्यवस्था, विकास व महिला सुरक्षा याच्याशी त्यांचा काहीही संबंध राहिलेला नाही, अशी टीका सपकाळ यांनी केली.

फडणवीस कुचकामी
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने केलेली आत्महत्या अत्यंत गंभीर व संवेदनशील आहे. राहुल गांधी यांनी त्याच अनुषंगाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. देवेंद्र फडणवीस हे कुचकामी गृहमंत्री ठरेल आहेत, त्यांच्या काळात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. तर दुसरीकडे फडणवीस यांच्या गृहमंत्रीपदाच्या काळात कोयता गँग, आका, खोक्या ही देणगी त्यांनी राज्याला दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR