मुंबई : प्रतिनिधी
बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील कोटा पोलिसांनी या प्रकरणातील ३ संशयिताला ताब्यात घेतले आहे. टायगर श्राफ याच्यावर गोळीबार केल्यानंतर आरोपींनी दुचाकीवरून पळ काढला होता. अंधेरीत दुचाकी टाकून आरोपींनी रेल्वेने पळ काढला होता. आता आरोपींना सूरत एक्सप्रेसमधून ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कोटा रेल्वे स्थानकावरून या संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणाची कोटा पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. तसेच, सुरक्षेचा मुद्दा आणि तपासाच्या गोपनीयतेमुळे ताब्यात घेतलेल्या संशयिताची ओळख अद्याप उघड करण्यात आलेली नाही. या प्रकरणासंदर्भात कोटा पोलिसांकडून लवकरच अधिकृत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.
तपास आता मुंबई क्राईम ब्रँचकडे
बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास आता मुंबई क्राईम ब्रँचकडे वर्ग करण्यात आला आहे. सुरुवातीला या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, घटनेची संवेदनशीलता पाहता तपास क्राईम ब्रँचकडे सोपवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. गोळीबार करणा-या तीन अज्ञात आरोपींचा शोध घेणे हे सध्या पोलिसांसमोर सर्वात मोठे आव्हान ठरले आहे. यातील ३ संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
















