छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणा-या मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी सतत मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला असून, याची माहिती आमदार बच्चू कडू यांच्याकडून देण्यात आली आहे. मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचे दोन वेगवेगळ्या पद्धतीने गट केले जाणार आहेत. किरकोळ गुन्हे आणि गंभीर गुन्हे अशी यादी तयार केली जात आहे. यातील किरकोळ गुन्हे तात्काळ मागे घेण्यात येणार असून, यासाठी पोलिसांकडून माहिती घेण्यात येत असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे.
दरम्यान पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की, ‘‘मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या असून, त्यांच्या वंशावळी शोधण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. मराठवाड्यात जुन्या नोंदी सापडताना अडचणी येत आहेत. ब-याच ठिकाणी कागदपत्र गहाळ झाली आहेत. मात्र, एका एका जिल्ह्यात ३० ते ३५ लाख कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचे हे यश आहे. या सर्वांची माहिती आम्ही मनोज जरांगे यांना देणार आहोत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २४ लाख, जालन्यात २१ लाख, परभणी जिल्ह्यात १ कोटी ९४ लाख कागदपत्रांची पाहणी करण्यात आली. ३३-३४ चे नमुने तपासले जात नव्हते. मात्र, आतापर्यंत ३१ लाख ३३ हजार ४६० एवढे ३३-३४ चे नमुने तपासण्यात आले आहेत. त्यामुळे कुणबी नोंदी सापडण्याचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे गावागावांत कुणबी नोंदी सापडत आहेत. तर, मराठवाड्यात आतापर्यंत ३१ हजार ५७६ नोंदी मिळाल्या असून, १२ हजार प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे.