विरधुनगर : फटाके बनवणा-या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात तब्ल २० कामगारांचा तडफडून मृत्यू झाला. यात घटनेत ६ कामगार जखमी झाले असून, काही कामगार ढिगा-याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. रविवारी दुपारी विरुधुनगर जिल्ह्यातील कट्टनारपट्टीमध्ये ही घटना घडली. स्फोटानंतर घटनास्थळाची दृश्ये थरकाप उडवणारी होती.
पोलिस आणि अग्निशामक दलाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, विरुधुनगर जिल्ह्यातील कट्टनारपट्टीमध्ये फटाके बनवण्याचा हा कारखाना आहे. हा स्फोट कारखान्याच्या एका युनिटमध्ये झाला आणि त्यानंतर स्फोटाचे लोळ चार युनिटपर्यंत पोहोचले. हादरवणा-या आवाजानंतर आगीच्या लोळांनी सगळेच कवेत घेतल्यानंतर धावपळ उडाली. काही कामगारांनी आपले जीव वाचले, पण काहींना पळण्याचीही संधी मिळाली नाही. हा स्फोट इतका भयंकर होता की आजूबाजूच्या इमारतींचेही नुकसान झाले आहे. पोलिस अधीक्षक श्रीनाथ यांनी सांगितले की, २० कामगारांचा मृत्यू झाला असून ६ जखमी झाले आहेत.
वानजा फायरक्रॅकर फॅक्टरीमध्ये हा स्फोट झाला. अनेक खोल्याचेही या स्फोटात नुकसान झाले आहे. या खोल्यामध्ये ३० कामगार होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी तासाभराच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली. त्यानंतर ढिगा-याखालून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले. फटाक्याच्या कारखान्यात हा स्फोट का झाला, याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, फटाके बनवत असतानाच काही चूक झाल्यामुळे ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी व्यक्त केला शोक
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी विरुधुनगर जिल्ह्यातील कनारपट्टी येथे घडलेल्या घटनेची दखल घेतली. त्यांनी घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांबद्दल दु:ख व्यक्त केले. मंत्री के. के. एस. आर. रामचंद्रन आणि थंगम थेन्नारासू यांना तातडीने घटनास्थळी जाऊन मदत कार्याला वेग देण्याच्या सूचना दिल्या आहेत असेही मुख्यमंत्री म्हणाले.

