बीजिंग : चीनमधील एका फटाक्याच्या फॅक्ट्रीत झालेल्या भीषण स्फोटात २१ जणांचा मृत्यू झाला असून ६१ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
चीनच्या हुनान प्रांतात ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. स्फोटानंतर तातडीने घटनास्थळी अग्निशमन दल, बचाव पथक आणि वैद्यकीय कर्मचा-यांना पाचारण करण्यात आले. हा स्फोट सोमवारी संध्याकाळी झाला. या घटनेनंतर चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही व्हीडीओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये एका मोठ्या परिसरातून धुराचे लोट उठताना दिसत आहेत.
तिथे इमारती कोसळल्या असून ढिगारा विखुरलेला दिसत आहे. मात्र या व्हीडीओच्या सत्यतेची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. रिपोर्टनुसार, हा स्फोट हुआशेंग फायरवर्क्स मॅन्युफॅक्चरिंग अँड डिस्प्ले कंपनी’ मध्ये झाला आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी स्फोटाच्या कारणांचा शोध घेण्याचे आदेश दिले असून या घटनेसाठी जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच त्यांनी अधिका-यांना प्रमुख उद्योगांमधील धोक्यांची तपासणी करणे, आपत्ती निवारण यंत्रणा मजबूत करणे, सार्वजनिक सुरक्षितता वाढवणे आणि लोकांचे जीवन व मालमत्तेचे संरक्षण अधिक चांगल्या प्रकारे करण्याचे आदेश दिले आहेत.

