नवी दिल्ली : वृत्तसंस्था
शुक्रवारी रात्री उशीरा दिल्लीच्या बाहेरील भागातील मंगोलपुरी औद्योगिक क्षेत्रात (फेज १) एका बूट कारखान्यात भीषण आग लागली. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून, इतर दोघे रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. ही घटना रात्री साडेनऊच्या सुमारास कारखान्यात घडली.
आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अनेक तास शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली आणि कारखान्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव कार्यादरम्यान कारखान्यातून सहा जणांना बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने मंगोलपुरीतील संजय गांधी मेमोरियल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी चौघांना मृत घोषित केले, तर उर्वरित दोघांवर उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, आग कारखान्याच्या तळघरात (बेसमेंट) लागली होती, त्यानंतर धूर आणि ज्वाळा वरच्या मजल्यांपर्यंत पसरल्या. कारखान्यात पसरलेल्या दाट धुरामुळे बचाव कार्यात अडथळे आले.
















