अमरावती : भाजप महायुती सरकारने राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजवर राज्यात सर्वात वेगवान आणि तीव्र प्रतिक्रिया कोणी दिली असेल, तर ती बच्चू कडू यांनी. बच्चू कडू यांनी अमरावती इथे रस्त्यावर उतरत, जाहीर केलेले पॅकेज ही बनवाबनवी असल्याचे म्हणत, अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सोयाबीन पेटवत निषेध केला आहे. बच्चू कडू यांच्या या आंदोलनात शेतकरी सहभागी झाले होते. त्यांनी सरकारच्या पॅकेजचा निषेध केला. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी बांगड्या फोडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
बच्चू कडू म्हणाले, हे पॅकेज बनवाबनवीच आहे का की अजून कायच हे निष्पन्न होत नाही. आमचे आंदोलन कर्जमुक्तीचे होते, आमचा एमएसपीच्या २०% बोनस देण्याचे होते, दिव्यांगांचे होते, मच्छिमारांचे होते, मेळ मेंढपाळांचा होते, आज मार्केटमध्ये सोयाबीन तीन हजार रुपये, कापूस सहा हजार रुपये आहे अजूनही शासकीय खरेदी केंद्र सुरू झाले नाही. ११००० रुपयाचा कापूस सहा हजार रुपये मार्केटमध्ये विकावा लागतो. सोयाबीन तीन हजार रुपयाला विकावे लागते, मग याची नुकसान भरपाई देणार कोण? असा सवाल बच्चू कडू यांनी केला.
२८ ऑक्टोबरला मोर्चा
शासकीय खरेदी केंद्र केव्हा सुरू होणार? असा प्रश्न करता, या सर्व मुद्यासाठी आम्ही नागपूरला २८ तारखेला मोठा मोर्चा काढणार आहोत, आम्ही परत येणार नाही, आम्ही नागपूर चारही बाजूने घेरल्याशिवाय राहाणार नाही, कर्जमुक्ती शिवाय आमचे पाय परतणार नाही, जेवढे दिवस थांबायचे आम्ही तेवढे दिवस नागपुरात थांबू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.

