कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसने आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘१० वचने’ सादर करत राज्याच्या विकासाचा पुढचा रोडमॅप मांडला आहे. यामध्ये राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना दिलासा देण्यासाठी वर्षाला १८ हजार रुपये भत्ता देण्यावर भर देण्यात आला आहे.
जाहीरनाम्यातील सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे ‘दुआरे चिकित्सा’ योजना. याअंतर्गत प्रत्येक ब्लॉक, शहरात आरोग्य शिबिरे आयोजित करून लोकांच्या घरापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवली जाणार आहे. ‘लक्ष्मी भंडार’ योजनेच्या रक्कमेत वाढ करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार सामान्य प्रवर्गातील महिलांना दरमहा १,५०० रुपये, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील महिलांना दरमहा १,७०० रुपये मिळतील. दरम्यान आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते हिमंता बिस्वा सरमा यांनी शुक्रवारी ‘जालुकबारी’ विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सलग सहाव्यांदा या मतदारसंघातून विजय मिळविण्याच्या निर्धाराने सरमा निवडणूक रिंगणात उतरले असून, अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी गुवाहाटीमध्ये भव्य रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
आईचा आशीर्वाद आणि भव्य मिरवणूक
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मुख्यमंर्त्यांनी त्यांच्या मातोश्री मृणालिनी देवी यांचा आशीर्वाद घेतला. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आईच्या आशीर्वादानेच व्हायला हवी अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर खनापाडा ते हेंगराबारी अशा सुमारे ५.६ किमी अंतराच्या भव्य मिरवणुकीत ते सहभागी झाले. मुसळधार पाऊस असूनही हजारो कार्यकर्त्यांनी या रॅलीला मोठी गर्दी केली होती. यावेळी बिहू नर्तक व पारंपरिक वाद्यांच्या गजरात त्यांचे स्वागत झाले.

