23.4 C
Latur
Sunday, October 6, 2024
Homeलातूरमांजरा धरण ९० टक्के भरले; लातूरकरांची पाण्याची चिंता मिटली

मांजरा धरण ९० टक्के भरले; लातूरकरांची पाण्याची चिंता मिटली

बीड : प्रतिनिधी
बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्याला पाणी पुरवणारे मांजरा धरण अखेरीस ९० टक्के भरले आहे. मराठवाड्यातील इतर धरणांच्या तुलनेत सर्वांत उशिरा हा प्रकल्प भरला आहे.
दरम्यान, सध्या परतीचा पाऊस सुरू असून यंदा राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत धरणसाठ्यात मागे असलेल्या मराठवाड्यात धरणे तुडुंब भरली आहेत. मराठवाड्यातील सर्वांत मोठे जायकवाडी धरण भरल्यानंतर अर्धी चिंता मिटली असली तरी काही जिल्ह्यांमध्ये धरणसाठा जेमतेमच होता. आता परतीच्या पावसाचा वाढलेला जोर या धरणांसाठी फायद्याचा ठरतोय.

बीड जिल्ह्यातील मांजरा धरण ९०.४२ टक्के भरले आहे. त्यामुळे परिसरातील शेतक-यांना मोठा दिलासा मिळालाय. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने मांजरा धरण ९०.४२ टक्के भरले आहे. १३९२ क्युसेक्स वेगाने सध्या धरणात पाण्याची आवक सुरू आहे. तर पाणी पातळी ६४२ मिलिमीटरवर पोहोचली आहे. धरण परिसर क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.

केज तालुक्यातील मांजरा धरण हे बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांच्या सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरले आहे. या महत्त्वपूर्ण धरणाची वाटचाल पूर्ण क्षमतेने भरण्याच्या दिशेने सुरू आहे. यामुळे शेती, पिण्याचे पाणी व औद्योगिक वसाहतीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.

शेतक-यांना दिलासा मिळणार
२०२०-२१ व २२ मध्ये मांजरा धरण भरले होते. परिणामी प्रकल्पाचे उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी सोडल्यामुळे सलग तीन वर्षे शेतीला पाणी मिळाले होते. मागील वर्षी मांजरा धरण प्रकल्प न भरल्याने शेतीला पाणी मिळाले नाही. पण यंदा ९०.४२ टक्के होऊन अधिक पाणीसाठा झाल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.

माजलगाव धरणातही पाण्याची चांगली आवक
मागील वर्षापासून शून्यावर व महिनाभरापूर्वी मृतसाठ्यात असणारे माजलगाव धरण ऑगस्ट महिन्यात शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसाने एका दिवसात १८ टक्क्यांवर गेले होते. आता माजलगाव धरणात ८०.१० टक्के पाणीसाठा झाला असून बीड शहरातील शेतक-यांच्या पिकांसह नागरिकांची तहान भागणार आहे. मागील वर्षी माजलगाव धरण याच सुमारास ५०.८२ टक्क्यांवर होते. यंदा पाऊस चांगला झाल्याने बीडकरांची चिंता मिटली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR