मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे किमान व्यावहारिक ज्ञान असणे अनिवार्य असून, या नियमाची अंमलबजावणी गुरुवार २० ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. मराठीचे व्यावहारिक ज्ञान नसलेल्या चालकांना सुरुवातीला एक महिन्याची नोटीस देण्यात येईल. या कालावधीत मराठीचे ज्ञान प्राप्त न केल्यास त्यांचा बॅज तीन महिन्यांपर्यंत निलंबित करण्यात येईल, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी दिला. त्यानंतरही मराठी शिकण्यास जाणीवपूर्वक नकार दिल्यास बॅज आणि परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात १९८९ पासून असलेल्या नियमाच्या आधारे रिक्षा आणि टॅक्सी चालविण्यासाठी व्यावहारिक मराठीचे ज्ञान आवश्यक आहे. १२ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आलेल्या संबंधित कायदेशीर तरतुदीनुसार आता या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. मराठी शिकणार नाही, बोलणार नाही, अशा प्रकारची भूमिका घेणा-या चालकांविरोधात कायद्याच्या चौकटीत कारवाई करणे हे परिवहन विभागाचे कर्तव्य आहे. अशा चालकांना आता कोणतीही अतिरिक्त मुदत न देता कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नवीन बॅज देताना मराठीची व्हीडीओ रेकॉर्डिंगद्वारे तपासणी
आतापर्यंत सुमारे ९ लाख ६५ हजार रिक्षा-टॅक्सी परवाने आणि बॅज देण्यात आले आहेत. यापुढे नवीन परवाना आणि बॅज देताना चालकाला व्यावहारिक मराठीचे ज्ञान आहे की नाही, याची आरटीओ अधिकारी प्रत्यक्ष संवादाद्वारे तपासणी करेल आणि त्याचे व्हीडीओ रेकॉर्डिंग केले जाईल. मराठीचे व्यावहारिक ज्ञान असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच बॅज देण्यात येणार असल्याचेही सरनाईक म्हणाले.
















