जालना: वीजबिलाची थकबाकीच्या पार्श्वभुमीवर भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या घरची वीजतोडणी केल्यानंंतर लोणीकरांचा संताप भलताच वाढला व त्यांनी महावितरणच्या कर्मचा-याला चक्क धमकी दिल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यावरुन लोणीकरांवर मोठी टीका केली जात आहे.
आमदार बबनराव लोणीकरांची महावितरणच्या कर्मचा-याला धमकी देणारी व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. व्हिडिओत बिल भरले तरी मीटर का काढून नेले, हिंमत असेल तर झोपडपट्टीमध्ये जाऊन मीटर काढा असे लोणीकर बोलताना दिसत आहेत. लोणीकरणांनी दादासाहेब काळे या महावितरणच्या कर्मचा-याला काही अपशब्दही वापरल्याचे दिसून येत आहे. आमदार बबनराव लोणीकरांच्या घराचे तीन लाखांपेक्षा जास्त थकबाकी असल्याची माहिती होती. त्यामुळे महावितरणने त्यांच्या घराचे मीटर कट केले. हे समजताच बबनराव लोणीकरांनी दादासाहेब काळे या कर्मचा-याला धमकी दिली.
महावितरणच्या कारवाईवर सर्वांचे लक्ष
दरम्यान या व्हिडिओवर काही प्रतिक्रिया देण्यास महावितरणच्या कर्मचा-यानेही तसेच आमदार लोेणीकरांनीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. सर्वसामान्य नागरिकांनी कारवाईला विरोध केला तर शासकीय कामात अडथळा आल्याचे कारण देत महावितरण संबंधितावर गुन्हा नोंद करते. आता आमदार बबनराव लोणीकरांनी महावितरणच्या कर्मचा-याला थेट धमकीच दिल्यानंतर महावितरण काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.