मुख्यमंत्र्यांची उपस्थिती, मराठवाड्यातील नेते गटात सामिल
सिल्लोड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सिल्लोड येथे शिंदे गटाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यासाठी सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी जोरदार तयारी केली होती. यावेळी मराठवाड्यातील माजी खासदार सुरेश जाधव, माजी मंत्री सुरेश नवले आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर शिंदे गटात सामिल झाले. यावेळी झालेल्या सभेला मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित झाला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौ-याच्या निमित्ताने अब्दुल सत्तार यांच्याकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. सिल्लोड शहरातील प्रत्येक मुख्य चौकात होर्डिंगबाजी करण्यात आली होती. तसेच ठीक-ठिकाणी जोरदार आतिषबाजी करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री यांच्यावर जोरदार पुष्पवृष्टीसुद्धा करण्यात आली. आमदार सत्तार हे मंत्रिमंडळाच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे त्यांनी शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले.
सिल्लोड येथे बोलताना शिंदे यांनी भाजप दिलेला शब्द पाळतो, नितीश कुमार यांना दिलेला शब्द पाळला, आता सांगा कोण खोटं बोलत आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. माझ्यावर विश्वास ठेऊन आलेल्यांमधील एकजणही म्हणाला नाही की, मी ईडीच्या धाकामुळे आलो आहे. आमच्या मर्जीने आलोय. आम्ही अन्यायाविरोधात लढण्यासाठी आलोय. शिवसेनेला वाचवण्यासाठी आलोय. ईडीच्या धाकाने, कोणत्याही तपास यंत्रणाच्या धाकाने कुणी येत असेल तर मला नकोय, असे शिंदे म्हणाले.