औरंगाबाद : महाविकास आघाडीतील अनेक नेते आणि मंत्री ‘ईडी’च्या रडारवर आले असतानाच आता, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि ठाकरे सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांच्या विरोधात कोट्यवधी रुपयांची बेनामी मालमत्ता जमवल्याचा आरोप करत त्यांच्याच मतदारसंघातील एका माहिती कार्यकर्त्याकडून ‘ईडी’कडे तक्रार करण्यात आली आहे. तर यावर आता अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलताना सत्तार म्हणाले की, काही बाजू नाही त्यात, आत्तापर्यंत त्या व्यक्तीने एक हजार तक्रारी केल्या आहेत. भाजपचा दलाल आहे तो, झिरो माणूस असून, त्यावर काय प्रतिक्रिया देणार, असे म्हणत सत्तार यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले. पण या तक्रारीनंतर आता ईडी काय भूमिका घेते हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरेल.