32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeमराठवाडाप्रियकराचा प्रेयसीवर अ‍ॅसिड हल्ला, प्रेयसीचा दुर्दैवी मृत्यू

प्रियकराचा प्रेयसीवर अ‍ॅसिड हल्ला, प्रेयसीचा दुर्दैवी मृत्यू

एकमत ऑनलाईन

बीड : लिव्ह इनमध्ये राहात असलेल्या प्रियकराने प्रेयसीवर अ‍ॅसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. दरम्यान प्रेयसीला बीडच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र, तिचा आज उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला

पुण्याहून गावाकडे येत असताना पहाटे 3 वाजेच्या सुमारास बीड तालुक्यातील येळंब (घाट) परिसरात निर्मनुष्य ठिकाणी मांजरसुंबा -केज हा मुख्य रस्त्यावरून जात असताना आरोपी तरुणाने गाडी थांबवली. त्यानंतर या तरुणाने रस्त्याच्या कडेला अगोदर तरुणीवर अ‍ॅसिड टाकले. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही, काही वेळाने त्याने पेट्रोल टाकून तरुणीला पेटवून दिले. तरुणीला पेटवून दिल्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला.

देगलूर तालुक्यातील शेळगाव येथील पीडितेचा विवाह तीन महिन्यांपूर्वी झाला होता. मात्र, गावातच असलेल्या अविनाश राजूरे या तरुणावर तिचे प्रेम होते. लग्नानंतरही प्रेमाच्या आणाभाका घेत आयुष्यभर साथ राहण्याच्या एकमेकांनी शपथा घेतल्या. दोघांनीही गावातून पलायन करुन पुणे गाठले. मात्र, तिथे या दोघांमध्ये वाद होऊ लागले.

अविनाशला दुसरे लग्न करण्यासाठी घरातील मंडळीने घाट घातला होता. त्यामुळे अविनाशने गावाकडं जाण्यासाठी पीडितेला सोबत घेतले. दोघेही पुण्यावरुन दुचाकीवर गावाकडे निघाले. बीडजवळ येताच अविनाशने तिच्या अंगावर अ‍ॅसिड फेकले आणि तिथून पसार झाला. पीडितेने आरडाओरड केल्यानंतर परिसरातून जाणारे नागरिक तिच्या मदतीला धावले.

जखमी पीडितेला बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान तिचा आज मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी पीडितेने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितल्यावर पोलिसांनी आरोपी अविनाशविरुद्ध नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपी अद्याप फरार आहे. अविनाशला पकडण्यासाठी बीड पोलिसांनी एक पथक रवाना केलं आहे.

नियोजित कट?
अविनाश आणि पीडिता पुण्याहून निघाल्यानंतर रस्त्यास अ‍ॅसिड कुठून मिळाले, हा मोठा प्रश्न आहे. अविनाशने पीडितेचा खून करण्याच्याच उद्देशाने गावाकडे जाण्याचा कट केला होता का?, असाही प्रश्न यावेळी उपस्थित होतो. या हत्येमागे आणखी कोणाचा हात आहे का, याचा तपास सध्या पोलीस करीत आहे.

आरोपीला अटक
दरम्यान, याप्रकरणी आरोपी अविनाश राजुरेला देगलूर पोलीसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत. अविनाश रामकिसन राजुरे (वय 25 रा.शेळगाव ता.देगलुर जि.नांदेड) असे आरोपीचे नाव आहे.रविवारी सायंकाळच्या सुमारास देगलुर पोलीसांनी अविनाश राजुरे यास अटक केली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

चित्रा वाघ यांचं ट्वीट
‘काल दिवाळीच्या दिवशीचं बीडमध्ये माँ जिजाऊच्या लेकीवर ॲसिड हल्ला झाला. तब्बल 12 तास रस्त्याच्या कडेला ती तडफडत होती, महिला सुरक्षेला कोणी वाली आहे की नाही, की फक्त भाषण घोषणा व संवादातचं सगळं विरलयं.. या घटना पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणार्या घटना कुठे गेले पुरस्कर्ते’, असं ट्वीट करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारवर निशाणा साधला.

निलेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
हाथरसच्या नावाने गरळ ओकणाऱ्या राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे?, असा सवाल करत बीडमध्ये तरुणीवर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्याचा भाजप नेते निलेश राणे यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. हाथरसवरुन राजकारण करणारे आता कुठं गेले?, असा सवालही त्यांनी यानिमित्ताने विचारला आहे.

राज्यात सातत्याने महिलांवर अन्याय अत्याचार होत असताना राज्य सरकार काहीही पावले उचलत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले आहेत, अशी टीका निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.

निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, ‘बीडमध्ये एका 22 वर्षीय तरुणीला अ‌ॅसिड टाकून ठार मारण्यात आलं. ही घटना दुर्दैवी आहे. हाथरसच्या नावाने गरळ ओकणाऱ्या राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे? महिला असुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले आहेत’.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या