लातूर/उस्मानाबाद : लातूरसह बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत सद्यस्थितीत ब-याच ठिकाणी सोयाबीन, कापूस, भाजीपाला आणि फळबागांना शंखी गोगलगायीने विळखा घातला असून, कोवळ््या पिकांसह फळबागा आणि भाजापाल्यालाही धोका निर्माण झाला आहे. सोयाबीन, कापसासह सर्वच कोवळ््या पिकांमध्ये गोगलगाईंचा प्रादुर्भाव वाढला असून, पिकांचे शेंडेच कातरले जात असल्याने थेट पिकांनाच धोका निर्माण झाला आहे.
संपूर्ण शेतातच गोगलगाई पसरल्याने त्याला रोखायचे कसे, याची चिंता शेतक-यांना भेडसावत आहे. केवळ लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातच नाही, तर सर्वत्र हे संकट उद्भवल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. लातूर जिल्ह्यात चार लाख हेक्टरच्या जवळपास पेरणी झालेली असून, यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातही तब्बल अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. मात्र, सरसकट पाऊस नसल्याने दोन्ही जिल्ह्यात बरेच क्षेत्र अजूनही पेरणीविना राहिलेले असून, आता पावसाची उघडीप होताच पुन्हा पेरणीला वेग येणार आहे. मात्र, अजूनही दिवसभर कोरडे वातावरण असताना रात्री पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे पेरणीला अडथळा निर्माण होत आहे.
त्यातच ब-याच शेतक-यांनी अगोदरच पेरणी केल्याने पिके जोमाने उगवली. परंतु कोवळ््या पिकांवर शंख गोगलगाईंचा प्रादुर्भाव वाढला आहे. शेतशिवारातील पिकांत सर्वत्र गोगलगाई दिसत असून, या गोगलगाई थेट कोवळ््या पिकांचे शेंडेच कापत आहेत. त्यामुळे खरीप पिके धोक्यात आली आहेत. गोगलगाईंच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी धास्तावला आहे. बरेच शेतकरी थेट गोगलगाई वेचून दूर फेकून देत आहेत. मात्र, ही संख्या मोठी असल्याने गोगलगाई वेचणे कठीण बनले आहे.
रात्रीतच सोयाबीन फस्त!
पावसाळ््याच्या सुरुवातीला पावसाने मारलेली दडी आणि मागच्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने वातावरण दमट बनले आहे. त्यामुळे शेत शिवारात प्रथमच शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र आहे. गोगलगाई रात्रीच्या वेळी कोवळे सोयाबीनचे पीक फस्त करीत आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.
कीड नियंत्रणासाठी अनुदान
सोयाबीन पिकावरील किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागामार्फत ७५० रुपये प्रतिहेक्टर अथवा ५० टक्के याप्रमाणे (कमाल १ हेक्टर क्षेत्रासाठी) जे कमी असेल त्या रकमेपर्यंत शेतक-यांना अनुदान मिळणार आहे. त्यासाठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क करावा, असे आवाहन केले आहे.
सामूहिक उपाययोजना आवश्यक
अशाप्रकारे शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव ज्या भागात मोठ्या प्रमाणात दिसून येत असेल, त्या भागातील शेतक-यांनी एकत्र येऊन सामूहिकरित्या उपाययोजना केल्यास गोगलगायीचे नियंत्रण लवकरात लवकर होऊ शकते. त्यासाठी कृषी विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पंचनामे करण्याची मागणी
गोगलगाईंच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनचे कोवळे पीक फस्त होताना दिसत आहे. त्यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले असून, यासंबंधी पंचनामे करून संकटात सापडलेल्या शेतक-यांना मदत करावी, अशी मागणी शेतक-यांमधून होत आहे.