….काही वेळातच मेडिकलमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटात डॉक्टर दुकानाच्या बाहेर पंधरा फूट लांब फेकले गेले
गेवराई : गेवराई तालुक्यातील बाग पिंपळगाव कॅम्प तलवाडा फाटा येथील केमिस्ट दुकानाला आग लागल्याची घटना घडली होती. या दुर्दैवी घटनेत डॉक्टरचा मृत्यू झाला होता. मात्र मयत डॉक्टर सुधाकर भाऊसाहेब चोरमले (35) यांनीच हा स्फोट घडवून आणल्याचा जवाब कंपाउंडरने दिल्यामुळे पोलिसांनी, मयत डॉक्टर व गंभीर जखमी असलेल्या कंपाउंडर सुनील माळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गेवराईपासून नजीक असलेल्या बाग पिंपळगाव येथे तलवाडा फाट्यावर डॉक्टर सुधाकर भाऊसाहेब चोरमले यांचे हॉस्पिटल आहे. रविवारी रात्री त्यांच्या शेजारी असेलल्या केमिस्ट दुकानाला लागलेल्या आगीत चोरमले यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले व त्यांनी ही आग आटोक्यात आणली होती. पोलिसांनीही घटनास्थळी जाऊन पंचनामा केला होता.
Read More मी कोरोनाच्या भीतीमुळे फाशी घेत आहे : सुसाईट नोट लिहून केली आत्महत्या
मात्र तपासामध्ये पोलिसांना काही गोष्टी संशयास्पद आढळून आल्या होत्या. डॉक्टर इतक्या रात्री मेडिकलमध्ये कशाला गेले ? हा प्रश्न पोलिसांना पडला होता. तेव्हा त्यांनी जखमी कंपाउंडरकडे या प्रकरणाची चौकशी केली सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी सुरू केल्यानंतर कंपाउंडरने घडलेली हकीगत पोलिसांना सांगितली.
कंपाउंडरच्या जबाबानुसार, मयत डॉक्टर व केमिस्ट चालकांचा देवाण-घेवाणी वरून जुना वाद होता. त्या रागातून डॉक्टरने कम्पाउंडरला रविवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास बोलावून घेतले. डॉक्टरने आधीच दुकानाची एक बनावट चावी बनवून घेतली होती. त्याच चावीने डॉक्टरने मेडिकलचे शटर उघडले व ते आत गेले आणि काही वेळातच मेडिकलमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटात डॉक्टर दुकानाच्या बाहेर पंधरा फूट लांब फेकले गेले, तर बाहेर उभा असलेला कंपाउंडर जखमी झाला. मेडिकलमध्ये मोठ्या प्रमाणावर सॅनिटायझर असावे असाही कयास लावला जात आहे. फ्रिज व सॅनिटायझरने पेट घेतल्यामुळे स्फोट झाला व डॉक्टर बाहेर फेकले गेले असावे, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.