हिंगोली : हिंगोली तालुक्यातील येळीत एका अल्पवयीन मुलीने बदनामीच्या भीतीने तसेच तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून विषारी औषध पिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात बासंबा पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील येळी येथील विशाल पवार हा तरुण गावातील एका अल्पवयीन मुलीच्या प्रेमात पडला होता. मात्र, त्याचे हे प्रेम एकतर्फी होते. मागील दोन वर्षापासून विशाल हा त्या मुलीस त्रास देऊ लागला होता. काही दिवसांपूर्वी त्याने मुलीच्या घरात जाऊन तू माझ्यासोबत लग्न कर आपण दोघे पळून जाऊ, असे सांगितले. मात्र, त्या मुलीने लग्नास नकार दिला.
दरम्यान, विशाल हा घरात आल्यामुळे आपली बदनामी होईल. या भीतीमुळे त्या मुलीने रविवारी पहाटे विषारी औषध पिले होते. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर आज त्या मुलीने बासंबा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी विशाल पवार या तरुणाविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.सहायक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, पोलिस निरीक्षक श्रीमनवार, उपनिरीक्षक सुरेश भोसले यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. उपनिरीक्षक भोसले पुढील तपास करीत आहेत.