27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमराठवाडामराठवाड्यात गेल्या दोन वर्षांत १३० नागरिकांचा वीज पडून मृत्यू

मराठवाड्यात गेल्या दोन वर्षांत १३० नागरिकांचा वीज पडून मृत्यू

एकमत ऑनलाईन

मुंबई : पावसाळा तोंडावर असून त्यादृष्टीने प्रशासन कामाला लागले आहे. असे असताना जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मराठवाड्यात दोन वर्षांत तब्बल १३० नागरिकांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मागील दहा वर्षांपासून एकाही नवीन वीजरोधक यंत्राची खरेदी करण्यात आली नसल्याचेसुद्धा समोर आले आहे. त्यामुळे मराठवाड्याचे काम जुन्या ३१ यंत्रांवरच भागवले जात आहे.

पावसाळा तोंडावर आला की, दरवर्षी मान्सूनपूर्व बैठका प्रशासनाकडून घेतल्या जातात. यावेळी आपत्ती निवारणासह अनेक सूचना करण्यात येतात. या बैठकीत वीज पडून होणारे मृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना प्रत्येकवेळी दिल्या जातात.

परंतु प्रत्यक्षात यावर हवी तशाप्रकारे अंमलबजावणी केली जात नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रत्येक जिल्ह्यांनी आपत्ती व्यवस्थापन निधीतून मागणीनुसार वीजरोधक यंत्र खरेदी करणे बंधनकारक आहे. पण त्याचीही अंमलबजावणी होताना दिसत नाही. कारण गेल्या दहा वर्षांत मराठवाड्यातील एकाही जिल्ह्याने नवीन वीजरोधक यंत्र खरेदी केले नसल्याचे समोर आले आहे.

दोन वर्षांत तब्बल १३० नागरिकांचा मृत्यू
एकीकडे दहा वर्षांत मराठवाड्यात एकही वीजरोधक यंत्र खरेदी करण्यात आले नसल्याचे समोर आले असताना दुसरीकडे गेल्या दोन वर्षांत १३० नागरिकांचा वीज पडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मराठवाड्यात वीज पडून २०२० मध्ये ५५ तर २०२१ मध्ये ७५अशा एकूण १३० निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. ज्यात २०२० मध्ये सर्वाधिक नांदेड जिल्ह्यातील १५ जणांचा वीज पडून मृत्यू झाला होता. तर २०२१ मध्ये सुद्धा सर्वाधिक २० जणांचा मृत्य झालेले नागरिक नांदेड जिल्ह्यातीलच होते.

कोणत्या जिल्ह्यात किती यंत्रं…
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत एकूण ३१ वीजरोधक यंत्र आहेत. ज्यात औरंगाबाद जिल्ह्यात ४, जालना ३, परभणी ४, हिंगोली २, नांदेड ४, बीड ६, लातूर ४ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ४ वीजरोधक यंत्र आहेत. त्यामुळे किमान यावर्षी तरी वीजरोधक यंत्र खरेदी करून नागरिकांचे जीव वाचवावे अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या