20.8 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeमराठवाडाम्युकरमायकोसिसचे औरंगाबाद, उस्मानाबादला रुग्ण

म्युकरमायकोसिसचे औरंगाबाद, उस्मानाबादला रुग्ण

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : म्युकरमायकोसिसचे रुग्ण जिल्ह्यामध्ये औरंगाबादसह उस्मानाबाद जिल्ह्यातही आढळुन येत आहेत. औरंगाबादमध्ये अद्यापपर्यंत १६ रुग्ण दगावले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहे. कोरोना आजाराच्या दुस-या लाटेपाठोपाठ आता औरंगाबाद शहरावर म्युकरमायकॉसिस या आजाराने कहर दाखवायला सुरुवात केली आहे. एक एप्रिलपासून १५ मे पर्यंत म्हणजे दीड महिन्याच्या काळात या आजाराचे २०१ रुग्ण शहराच्या विविध रुग्णालयांत दाखल असून, त्यांच्या पैकी १६ जणांचा मृत्यू झाला आहे.

आजाराचा उपचार खर्चिक असल्यामुळे व शासनाच्या माध्यमातून या आजारावरील उपचारासाठी अत्यल्प पॅकेज देण्यात आलेले असल्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसमोर आजाराबरोबरच आर्थिक प्रश्न देखील निर्माण झाला आहे. हा आजार कोरोनाचा आजार होऊन गेलेल्यांना होत असल्यामुळे या आजाराबद्दलचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. त्यामुळे महापालिकेने शहरातील खासगी दवाखान्यांकडून म्युकरमायकोसिस आजाराच्या रुग्णांबद्दल माहिती मागवली होती. त्यानुसार शहरातील ६ रुग्णालयांनी माहिती पाठवली आहे. माहितीवरुन १ एप्रिल ते १५ मे दरम्यान म्युकरमायकोसिस आजाराचे २०१ रुग्ण दाखल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी काही रुग्ण दहा मार्च पासून देखील हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत.

उस्मानाबादमधील एका डॉक्टरांकडे अशा प्रकारचे २ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील दोघांवर शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय आजाराबाबतच्या औषधांचाही मोठा तुटवडा सध्या जाणवत आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने म्यूकर मायकोसिस अधिक घातक ठरत असल्याचे चित्र असल्याचे सांगण्यात येत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातून दोन जणांना सोलापुरला उपचारासठी पाठवले आहे. तर खासगी दवाखान्यातून दहा ते वीस रुग्णांना तशी लक्षणे असल्याचे समोर आले आहे.

औरंगाबादला बळींची संख्याही मोठी
एमजीएम हॉस्पिटलमध्ये ७६ , एशियन हॉस्पिटलमध्ये २४, कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये ५, धूत हॉस्पिटलमध्ये ३, अपेक्स हॉस्पिटलमध्ये ४३ तर घाटी रुग्णालयात ५० रुग्ण दाखल झाले आहेत. या पैकी मधुमेही रुग्णांची संख्या ७६, ऑक्सिजनची कमतरता असलेल्या रुग्णांची संख्या ११०, स्टेरॉइड लागणा-यांची संख्या १४८ होती. २०१ रुग्णांपैकी १६ जण आतापर्यंत दगावले असून सध्या सात जणांवर उपचार केले जात आहेत, असे सांगण्यात येत आहे.

तौत्के चक्रीवादळाचा फटका; विजेचा लपंडाव

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या