24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमराठवाडालातूरसह नांदेड, उस्मानाबादेत पाऊस

लातूरसह नांदेड, उस्मानाबादेत पाऊस

एकमत ऑनलाईन

लातूर : मान्सून दाखल होऊनही पावसाची वाट पाहणा-या मराठवाड्यातील काही भागाला सोमवारी सायंकाळी पावसाने दिलासा दिला. लातूर जिल्ह्यातील काही भागांसह उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यातील काही भागांत पावसाने दमदार हजेरी लावली, तर परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील काही भागात सर्वसाधारण पाऊस झाला. पावसाने आज हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे.

लातूर शहरासह जिल्ह्यातील काही भागांत सोमवारी सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळपासून वातावरणात प्रचंड उकाडा होता. तसेच उन्हाची तीव्रताही अधिक होती. मात्र, सायंकाळी ५ नंतर आकाशात ढग दाटून आले आणि लातूर शहर परिसरासह जिल्ह्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावली. राज्यात मान्सून दाखल झाल्यापासून लातूर शहरात प्रथमच दमदार पावसाने हजेरी लावली. मात्र, हा पाऊस जिल्ह्यात सर्वदूर नाही. परंतु आज प्रथमच चांगला पाऊस झाल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यातील अनेक भागांत रिमझिम सरी कोसळत होत्या.

उस्मानाबाद शहरात सायंकाळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जवळपास दोन तासांपेक्षा जास्तवेळ पाऊस झाला. जिल्ह्यातील काही भागांत वरुणराजाने हजेरी लावली. त्यामुळे शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे जिल्ह्यात पावसाळी वातावरण झाले आहे. सकाळी जिल्ह्यात हवामान कोरडे होते. मात्र, दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार झाले. त्यानंतर सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत पावसाच्या सरी सुरूच होत्या. नांदेड जिल्ह्यात दोन दिवस जिल्ह्यात मेघ दाटून येत होते; मात्र पाऊस पडत नव्हता. त्यानंतर सोमवारी सायंकाळी ७ च्या सुमारास वरुणराजाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.

परभणी जिल्ह्यातही सायंकाळी ६ च्या सुमारास सर्वदूर पाऊस सुरू झाला. पूर्णा तालुक्यातील लिमाला परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. यासोबतच गंगाखेड तालुक्यातील डोंगर भागातदेखील पावसाच्या सरी बरसल्या. जिल्ह्यात काही शेतक-यांनी पेरणी केली आहे. त्यामुळे शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, परभणीकरांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.हिंगोली जिल्ह्यातील काही भागांत तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा मान्सूनची सुरुवात मंदपणे झाल्याने जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या. त्यामुळे शेतक-यांचे आकाशाकडे डोळे आहेत. त्यातच आता सरी कोसळल्याने पावसाची चाहुल लागली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या