26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeमराठवाडाजीआरमध्ये संभाजीनगर उल्लेख

जीआरमध्ये संभाजीनगर उल्लेख

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याचा मुद्दा पून्हा एकदा समोर आला आहे. राज्य सरकारच्या एका जीआरमध्ये संभाजीनगर असा उल्लेख केल्याने हा वाद उफाळून आला आहे. सरकारकडूनच असा उल्लेख करण्यात आल्याने नामांतरासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या मुद्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. खासदार इम्तियाज जलील यांनी आगामी निवडणुकीच्या पुढे शिवसेनेने राजकारण सुरू केल्याचा आरोप केला, तर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी नामकरण होणारच, असे म्हटले आहे.

सरकारी जीआरवर औरंगाबादचा संभाजीनगर म्हणून उल्लेख करण्यात आला आहे, तर जीआरमध्ये संभाजीनगर उल्लेख करून सही करणा-या अधिका-याने राजीनामा द्यावा अथवा त्याला बडतर्फ करण्याची खासदार इम्तियाज जलील यांची मागणी केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचेही दिसून आले. दुसरीकडे सरकारी पातळीवर अद्याप याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. मात्र, आता राज्य सरकारच्या एका महत्त्वाच्या जीआर म्हणजेच शासन आदेशावर संभाजीनगरचा उल्लेख केला गेला आहे. त्यामुळे पुन्हा नामकरणाचा वाद सुरू झाला.

राज्य शासनाने राज्य जागतिक गुंतवणूक प्रोत्साहन परिषदमध्ये उद्योजक राम भोगले यांची निमंत्रित सदस्य म्हणून निवड केली आहे, त्याचा जीआर सरकारने काढला आहे. त्या जीआरमध्ये राम भोगले यांच्या नावासमोर संभाजीनगर आणि नंतर औरंगाबाद असा उल्लेख केला आहे. त्यामुळे कागदोपत्री संभाजीनगर असे नामकरण होतेय का? या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे.

आरोप-प्रत्यारोप सुरू
नामकरणाच्या मुद्यावरून खा. इम्तियाज जलील यांनी निवडणुकीच्या पुढे शिवसेनेचे भावनिक राजकारण सुरू झाले आहे, असे सांगतानाच त्यांचेच सरकार आहे, त्यांनी नामकरण करून दाखवावे, असे म्हटले. त्यावर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्र्यांनी याबद्दल शब्द दिला आहे. त्यामुळे संभाजीनगर नामकरण होणारच, असे म्हटले आहे. त्यानंतर भाजपचे आशिष शेलार यांनी संभाजीनगर नामकरणाची भूमिका शिवसेनेची नव्हे, तर भाजपची असल्याचे म्हटले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या