तुळजापूर: हे संकट संपूर्ण शेती अर्थव्यवस्था उद्धवस्त करणारे आहे. या संकटावर, आलेल्या अडचणींवर एकजुटीने मात करू. सध्या दिवस वाईट आहेत, अडचणीचे आहेत परंतु धीर सोडायचा नाही. यावर मात करू. सरकार तुमचे आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना धीर दिला.
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या गावांची व पिकांची पाहणी करण्यासाठी शरद पवार मराठवाडा दौ-यावर आले आहेत. लातूर जिल्ह्यातील राजेगाव येथे त्यांनी नुकसानग्रस्त शेतक-यांशी संवाद साधला. यावेळी शेतक-यांनी त्यांच्या पुढे व्यथा मांडल्या. लातूर जिल्हयातील किल्लारी आणि परिसरात झालेल्या भूकंपाची आठवण त्यांनी यावेळी सांगितली. त्याकाळी लोकांना धीर दिला होता.तसेच संकट आता उभे असून पुन्हा मदतीची गरज शेतक-यांनी व्यक्त केली. पवार यांनी भुकंपाप्रमाणेच आत्ताचेही संकट असल्याचे सांगत दुष्काळ आल्यावर पिके नष्ट होतात परंतु या संकटात जमीनच खरवडून गेली आहे. जमिनीचे स्वरूपच बदलले आहे. हे नुकसान जास्त आहे, असे म्हणत शेतक-यांना दिलासा दिला.
लोकांना तातडीची मदत कशी देता येईल. खरवडून गेलेली जमीन कशी सावरता येईल आणि नुकसानीतून बाहेर पडण्यास मदत कशी होईल ही परिस्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. या संकटातून मार्ग काढावा लागेल. यासाठी राज्य व केंद्र सरकारशी बोलू. नुकसानीचे स्वरूप पाहता एकट्या राज्य सरकारची या सगळ्याला तोंड देण्याची परिस्थिती नाही. केंद्राची मदत मिळणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री आणि देशातील प्रमुख लोकांशी बोलून तातडीची मदत कशी देता येईल, असा प्रयत्न करणार असल्याचे पवार यांनी शेतक-यांना सांगितले.
भक्तांच्या नवसाला पावणारी खुर्दळीची जनमाता देवी